काळेवाडीत नगरसेविकेचे आंदोलन; सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ

पिंपरी पालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छता मोहिमेचे ढोल बडवले जात असतानाच, काळेवाडीतील वेगळेच चित्र दिसून आले. साचलेला कचरा अनेक दिवसांपासून उचलला जात नाही, त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कचऱ्याने भरलेल्या गाडय़ा क्षेत्रीय कार्यालयात आणल्या. तेथे कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावरून आंदोलक व सुरक्षाकर्मचाऱ्यांची वादावादी झाली.

काळेवाडीतील विजयनगर, शांती कॉलनी, गणेश कॉलनी, आदर्शनगर, अिजक्य कॉलनी, स्वामी समर्थ मंदिर परिसर, नढेनगर, कोकणेनगर, ज्योतिबानगर आदी भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून पालिकेच्या कचऱ्याच्या गाडय़ा येत नाहीत. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग लागले होते व त्याची परिसरात दरुगधी पसरली होती. पालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबतची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. कचरा वाहून नेणाऱ्या काही गाडय़ा बिघडल्या आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. या परिस्थितीला कंटाळलेल्या नागरिकांनी नगरसेविका नीता पाडाळे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांनी पालिकेच्या जितक्या गाडय़ा कचरा वाहून नेत होत्या, त्या अडवल्या आणि ब क्षेत्रीय कार्यालयात आणल्या. त्यातील कचरा खाली टाकण्याचा आंदोलकांचा मानस होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यास विरोध केला. गाडय़ांच्या चाव्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढून घेतल्या. आरोग्य अधिकारी घाईने तेथे आले. त्यांनी यापुढे असे होणार नाही, वेळीच कचरा उचलला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर पाडाळे यांनी आंदोलन मागे घेतले.

कचरा उचलण्यासाठी असलेल्या ९ पैकी दोन गाडय़ा बिघडल्या आहेत. त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. काळेवाडीत कचरा टाकण्यासाठी जागा नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून पत्राशेड मारून कचरा टाकण्यात येणार आहे. यापुढे वेळेत कचरा उचलला जाईल.

संदीप खोत, आरोग्य अधिकारी, पिंपरी पालिका.