तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून महापालिकेच्या सभागृहाचा चेहरामोहरा आता बदलण्यात आला आहे आणि अनेक अत्याधुनिक सोयीसुविधाही सभागृहात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, एवढा खर्च करून सभागृह सुधारले, आता सर्वपक्षीय नगरसेवक कधी सुधारणार, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होईल आणि महापालिकेच्या सभा नव्या सभागृहात सुरू होतील. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांत सभागृहाचे कामकाज ज्या पद्धतीने सुरू आहे, ते पाहता सभागृह सुधारले, पण त्याचा दर्जा कधी उंचावणार हा मुख्य प्रश्न आहे. महापालिकेत २००७ साली राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तीन पक्षांच्या ‘पुणे पॅटर्न’ची सत्ता आली आणि तेव्हापासून आजतागायत सभांचा दर्जा खालावलेलाच राहिला. महापालिकेचे जे सभागृह उत्तमोत्तम भाषणांसाठी, अभ्यासपूर्ण चर्चासाठी, कायदे-नियम यांच्या चर्चासाठी, खिलाडूपणासाठी प्रसिद्ध होते, त्याच सभागृहात आता जणू कायमचीच भाषणबंदी असल्यासारखी परिस्थिती सर्वपक्षीय नगरसेवकांच्या ‘कर्तबगारी’मुळे निर्माण झाली आहे.
महापालिका सभा कशी चालवायची यासाठी सभा कामकाज नियमावली आहे. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांत या नियमावलीचा भंग प्रत्येक सभेत नेमाने होत आहे. सभा सुरू होताना तातडीचे प्रश्न, त्यानंतर लेखी प्रश्नोत्तरे, त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषय या क्रमाने सभा चालणे अपेक्षित असताना ही प्रक्रिया सर्व पक्षांकडून आता धुडकावली जात आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने लेखी प्रश्नोत्तरेही गेल्या काही वर्षांत बंद केली आहेत. त्यामुळे सभेपूर्वी शहराच्या विषयांवर विविध प्रश्न देणे हा एक उपचारच राहिला आहे.
महापालिका सभेत नगरसेवक दंगा करतात, गोंधळ घालतात, हाणामाऱ्या करतात, तोडफोड करतात, हे सर्वश्रुत होते आणि घडायचेही तसेच. मात्र, गेल्या वर्षी जी निवडणूक झाली आणि जे नवे सभागृह तयार झाले त्यातील अनेक नगरसेविकाही आता अशा सर्व उद्योगांमध्ये आघाडीवर असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. त्यामुळेच सभेतील अनेक नियम आणि सभागृहातील प्रथा-परंपरांचे उल्लंघन ही बाब सततच होत आहे.
महापौरांच्या आसनापुढे लाकडी तटबंदी
नव्या सभागृहात महापौरांच्या आसनापुढे भक्कम लाकडी कठडा उभारण्यात आला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या आंदोलनांमुळे, नगरसेवकांकडून वारंवार महापौरांच्या व्यासपीठावर जाण्यासारखे जे प्रसंग होतात त्यामुळे, तसेच सभेत वेळोवेळी होणाऱ्या तोडफोडीमुळे, मानदंड पळवण्याच्या प्रकारामुळेच आणि बेशिस्त वर्तनामुळेच हा कठडा उभारण्यात आला आहे.