|| चिन्मय पाटणकर

भारतीय रंगभूमी गाजवलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या विजय तेंडुलकर लिखित नाटकाची दुर्मिळ चित्रफीत हाती आली आहे. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) संग्रहातून जवळपास २६ मिनिटांची मूळ चित्रफीत हाती आली असून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आता या चित्रफितीचे जतन करणार आहे. नाटकाच्या अगदी सुरुवातीच्या प्रयोगांमधील हे चित्रीकरण असल्याने हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, नंदू पोळ, मोहन गोखले अशा अनेकांच्या भूमिका होत्या. मराठीच नाही, तर भारतीय रंगभूमीवर महत्त्वाच्या ठरलेल्या या नाटकाची संहिता उपलब्ध आहे. मात्र, फारसे दृक्श्राव्य साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे मूळ संचात हे नाटक कसे सादर व्हायचे, याची कल्पना नव्या पिढीला नाही. मात्र, आता मिळालेल्या या चित्रफितीमुळे नाटकासंदर्भातील मूळ दस्तऐवज हाती आला आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनीही या माहितीला दुजोरा दिला. ‘एफटीआयआयमध्ये नाटकाच्या सादरीकरणावेळी केलेले हे चित्रीकरण असावे. या नाटकाविषयी फारच थोडे दृक्श्राव्य साहित्य उपलब्ध आहे. त्या दृष्टीने ही चित्रफीत हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे २६ मिनिटांचेच चित्रीकरण का आहे, त्याला जयराम कुलकर्णीचे निवेदन का आहे, अशा प्रकारचे अजून काही चित्रीकरण आहे का, याचाही शोध घेतला जाणार आहे. मिळालेल्या चित्रफितीला असलेल्या काही तांत्रिक अडचणी प्रक्रिया करून दूर करता येतील,’ असे मगदूम यांनी लोकसत्ताला सांगितले.

चित्रफितीविषयी कोणालाच कल्पना नाही

‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची चित्रफीत फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. डॉ. मोहन आगाशे चार वर्षे संस्थेच्या संचालकपदी असूनही त्यांना त्यांच्या कार्यकाळात ही चित्रफीत पाहायला मिळाली नव्हती.

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाची तीन चित्रीकरणे उपलब्ध आहेत. त्यात जब्बार पटेल यांनी इंडियन थिएटर या माहितीपटासाठी केलेले आणि ‘महाराष्ट्राच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमासाठी केलेले, अशी दोन सुमारे चार मिनिटांपर्यंतची उत्तम दर्जाची चित्रीकरणे आहेत. तसेच संगीत नाटक अकादमीने एका कॅमेऱ्याने आणि बऱ्यापैकी लांबून संपूर्ण नाटकाचे चित्रीकरण केले होते. त्या वेळी आजच्यासारखे डिजिटल आणि उच्च दर्जाचे कॅमेरे नसल्याने ती चित्रफीत तितकी सुस्पष्ट नाही. मात्र, एफटीआयआयमध्ये मिळालेली चित्रफीत अगदी सुरुवातीच्या काळातील आहे, हे त्याचे महत्त्व आहे. या चित्रफितीमध्ये दोन-तीन प्रसंग आहेत आणि बाकी निवेदन आहे. हाती आलेल्या चित्रफितीवर प्रक्रिया केल्यास ती चांगली होईल.   – डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

चित्रफितीची वैशिष्टय़े

  • युमॅटिक प्रकारातील टेप
  • १७७३-७४च्या सुमारासचे चित्रीकरण
  • कोण्या परदेशी छायालेखकाने केलेले चित्रीकरण
  • २६ मिनिटांची चित्रफीत
  • जयराम कुलकर्णी यांचे निवेदन
  • घाशीरामच्या मृत्यूप्रसंगातील डेथ डान्स
  • अभिनेत्यांचे ‘क्लोज अप’