पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरातील भूतपुराणाची राज्यभरात चर्चा घडली. भूत दिसले असे म्हणणाऱ्या मजुरांना तसेच मांत्रिकाला ताब्यात घेण्यात आले. केवळ नाटय़गृहापुरतीच ही अंधश्रद्धा मर्यादित नाही, त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे. प्रसार माध्यमांनी हा विषय लावून धरल्याने या ठिकाणी शासकीय यंत्रणा कामाला लागली. अजूनही अशा पद्धतीचे शेकडो प्रकार सुरूच आहेत, त्याचे काय करायचे, हा प्रश्न कायम आहे.

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात नूतनीकरणाचे काम सुरू असताना मजुरांना भूत दिसले. त्यामुळे त्यांनी काम बंद केले. परिणामी, काही दिवस काम रखडले. भूतांना पळवून लावण्याच्या हेतूने गावाकडून मांत्रिक बोलावण्यात आला, त्याने तंत्रविद्येचा वापर केला आणि सर्वकाही ठीकठाक झाले, या भावनेतून पुन्हा काम सुरू करण्यात आले. या आशयाची बातमी ‘लोकसत्ता’मध्ये (१४ मार्च) प्रसिद्ध झाली आणि सगळीकडे एकच कल्लोळ झाला. विविध वाहिन्यांच्या पत्रकारांनी ही बातमी दाखविली. त्यात भर म्हणजे, मंत्रतंत्र करतानाचे चित्रीकरण प्रसारित झाल्याने केवळ शहरातच नव्हे, राज्यभरात हा विषय चर्चेचा ठरला. नाटय़गृहात काम करणाऱ्या कामगारांच्या म्हणण्यानुसार, व्यासपीठावरील अंधाऱ्या कोपऱ्यात एका महिलेचे भूत दिसते. ती हाका मारते. तेथे बांगडय़ांचा आवाज येतो. काही वेळा मोठय़ाने आरडाओरडा सुरू असल्याचा भास होतो. काळी गडद प्रतिमा इकडून तिकडे जाताना दिसते. सायंकाळी सहानंतर कोणी काम करण्यास धजावत नसल्याने सायंकाळनंतर काम बंदच ठेवण्यात येते. असा हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा मामला चर्चेत आल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. भूतप्रेत, हाकामारी या भूलथापा असल्याचे सांगत तसे सिद्ध केल्यास २१ लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटू लागल्याने शासकीय यंत्रणेवर दबाव आला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी अहवाल मागवण्यात आला. घाईने तयार केलेल्या अहवालानुसार ठेकेदार, त्याचे तीन कामगार आणि संबंधित मांत्रिकास दोषी धरण्यात आले. पोलिसांनी धरपकड सुरू केली. एकेकास गजाआड घातले.

या घटनेत प्रसारमाध्यमांकडून बोभाटा झाल्यामुळे कारवाई होऊ शकली. वास्तविक, असा काही प्रकार झाल्याची अधिकाऱ्यांना पूर्ण माहिती होती. तेव्हा त्यांनी काहीही भूमिका घेतली नाही. काम बंद ठेवण्यापासून त्यांनी कोणालाही, कसलाही अटकाव केला नाही. याचाच अर्थ या प्रकाराला त्यांची मूकसंमती होती. मात्र, आपल्यावर खापर फुटू नये म्हणून अधिकाऱ्यांनी शेवटी कामगारांना बळीचा बकरा केले. ज्यांनी पत्रकारांना माहिती दिली, वाहिन्यांना प्रतिक्रिया दिली, त्यांच्यावरच कारवाई झाली. वास्तविक, स्वत:ची कातडी बचावू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी. केवळ अत्रे नाटय़गृहातच अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात आले, असे काही नाही. सर्रास ठिकाणी असे प्रकार होत असतात. राजकीय नेत्यांमध्ये याचे स्तोम दिसून येते. मोठे अधिकारी नवीन पदभार घेताना मुहूर्त पाहतात. उगवत्या दिशेला कार्यालयाचे तोंड असावे, असा अनेकांचा प्रयत्न असतो. लिंबू-मिरच्या वाहनांना तसेच कार्यालयाला लागलेल्या दिसून येतात. हातात गंडे, दोरे असतात. बुवा अन् महाराजांची छायाचित्रे आवर्जून लावली जातात. अमावस्येच्या दिवशी महत्त्वाची कामे केली जात नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा या दृष्टिकोनातून साधकबाधक विचार व्हायला हवा.

उगवत्या भाई मंडळींना आवरा

तलवारीने केक कापून एकप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे उद्योग मोडून काढण्याचे पोलिसांनी मनावर घेतले, ते एका अर्थाने बरेच झाले. अति झाले की माती होते असे म्हणतात. अगदी तसेच अशा स्वरूपाच्या वाढदिवसांबाबत झाले होते. शहरात गल्लीबोळात, रस्त्यावर कुठेही असे वाढदिवस साजरे होऊ लागले होते. केक कापण्यासाठी तलवारीचा वापर होत होता. ही छायाचित्रे समाज माध्यमांवरही प्रसारित करण्यात येत होती. दुर्दैवाची बाब म्हणजे, लोकप्रतिनिधी या तलवारबाजीच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. केवळ केक कापण्याइतकाच मर्यादित असा हा प्रकार नाही. मध्यरात्रीनंतर फटाक्यांची मोठय़ा प्रमाणात आतषबाजी केली जाते. रात्री कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या मोटारी फिरतात. दुचाकींच्या सायलेन्सरचे चित्रविचित्र आवाज काढले जातात. रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात कट्टय़ांवर बसून नको ते चाळे सुरू असतात. उशिरा का होईना, पोलिसांनी कारवाईचे धोरण अवलंबले. केवळ आरंभशूरपणा न करता पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवले पाहिजे. धनदांडग्यांच्या या उद्योगाकडे वरकमाईचे प्रभावी साधन म्हणूनही पाहू नये. अन्यथा, अशा स्वयंघोषित उगवत्या भाई मंडळींना आवर घालणे अवघड होऊन जाईल.

संगनमताने जनतेच्या पैशांची उधळपट्टी

पिंपरी महापालिकेने कोटय़वधी रूपये खर्च करून संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे रंगमंदिर उभारले. प्रत्यक्षात ते असून नसल्यासारखे आहे. तेथे नाटकांचे प्रयोग होत नाहीत, ते सर्वार्थाने गैरसोयीचे नाटय़गृह आहे. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षही तेथे कार्यक्रम घेण्यास उत्सुक नसतात. येथे अभावानेच कार्यक्रम होतात. महापालिकेला नावालाही उत्पन्न नाही. असे असतानाही या नाटय़गृहाचे नूतनीकरण होत असून त्यासाठी जवळपास पाच कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सर्वाचे आर्थिक हित लक्षात घेऊन संगनमताने नूतनीकरणाचे काम काढण्यात आले. सुरूवातीला तेथे एक अपघात झाला, मजूर खाली पडून मृत्युमुखी पडला. त्यावरून बरेच प्रश्न निर्माण झाले. ते मिटवण्यात बराच काळ गेला. त्यानंतर, आता भुताटकीचे प्रकरण उघडकीस आले.

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com