आखाती देशातून सोने मुंबईत आणणे कठीण बनल्यामुळे अलीकडे कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या ‘डी’ कंपनीकडून पुण्यातील लोहगाव विमानतळाचा आधार घेतला जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात सोन्याच्या तस्करीसाठी आणलेले दीड कोटीचे सोने सीमा शुल्क विभागाने लोहगाव विमानतळावर जप्त केले आहे.
 सोने तस्करीसाठी ‘डी’ कंपनीकडून मुंबई विमानतळाचा वापर केला जात होता. काही वर्षांपासून मुंबई विमातळावरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्यामुळे सीमा शुल्क न भरता सोने घेऊन येण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून सोने तस्करीसाठी लोहगाव विमानतळाचा वापर केला जात आहे, ही बाब महाराष्ट्र पोलिसांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभाग, दहशतवादविरोधी पथक, तसेच पोलिसांनीही करडी नजर ठेवली आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल दीड कोटींपेक्षा जास्त सोने जप्त करण्यात आले आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात दुबईहून सोने घेऊन येणाऱ्या हसन जमालुद्दीन खान आणि राजा मेहंदी सय्यद यांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३५ लाख ५० हजार रुपयांचे १२७० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ऑक्टोंबर २०११ मध्ये पायातील मोजामध्ये दुबईहून स्मगलिंगसाठी अडीच किलो सोने घेऊन येणाऱ्या केरळच्या व्यक्तीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. सोने तस्करीमध्ये केरळ आणि कर्नाटकमधील भटकळ या गावातील व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले होते.
तस्करीसाठी गरीब व्यक्तींचा वापर?
सोने तस्करी केल्याबद्दल लोहगाव विमानतळावर पकडण्यात आलेल्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या व्यक्तींकडे लाखोंचे सोने कोठून आले, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला होता. याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तींना ‘डी’ कंपनीकडून सोन्याची असे सोने पोहोचवण्यासाठी प्रत्येक खेपेस पन्नास हजार रुपये दिल्याचेही समोर आले. तस्करीचे सोने आणण्यासाठी आतापर्यंत वेगवेळ्या पद्धतींचा वापर होत होता. मात्र, गेल्या रविवारी खजुरामध्ये सोन्याच्या लगडी लपवून आणल्याचे आढळून आले. यातून सोने तस्करीसाठी वेगवेगळी पद्धत अवलंबल्याचे समोर येत आहे. आता एटीएस, पुणे पोलीस यांनी लोहगाव विमानतळावर सोने तस्करीकडे लक्ष दिले आहे, अशी माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.