महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या निवडणुकांसाठीची प्रभाग रचना निश्चित करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रभाग रचना करताना त्यात मानवी हस्तक्षेप कमी व्हावा यासाठी ‘गूगल मॅपिंचा आधार घेतला जाणार असून निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर लगेचच त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठीची अधिसूचना शासनातर्फे नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना निवडणूक आयोगालाही पाठविण्यात आली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावरील हरकती-सूचना मागवणे आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे असा
कार्यक्रम ठरविण्यात येईल. त्यासंबंधीची सूचना निवडणूक आयोगाकडून प्राप्त होताच, महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
सध्याची प्रभागरचना बदलण्यासाठी प्रभागाच्या हद्दींची नव्याने निश्चिती केली जाईल. सन २०१२ साली झालेली महापालिका निवडणूक दोन सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने झाली होती. तर त्या आधीची २००७ साली झालेली निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने झाली होती. महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग या रचनेप्रमाणे होणार असल्यामुळे सध्याच्या चार वॉर्डचा मिळून एक प्रभाग होणार आहे. प्रभागांची निश्चिती करत असताना काही वेळा विविध घटकांनी हस्तक्षेप केल्याच्या तक्रारी केल्या जातात. त्यामुळे प्रभागांची हद्द निश्चित करताना सध्या उपलब्ध असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने महापालिकांना केल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेनेही शहराच्या संपूर्ण नकाशाची ‘इमेज’ गूगलकडून प्राप्त करून घेतली आहे. निवडणूक आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होताच याच नकाशाचा वापर करून प्रभागाची रचना तयार केली जाणार असल्याचे संकेत कुलकर्णी यांनी दिले.
लोकसंख्येनुसार मतदार संख्येचे गट (ब्लॉक) तयार करून गूगल मॅपगिंच्या आधारे प्रभागाची रचना निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी महत्त्वाचे रस्ते तसेच नैसर्गिक हद्दी विचारात घेतल्या जाणार आहेत. प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केल्यानंतर कोणाचे आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना अंतिम केली जाईल. या प्रक्रियेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होताच प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात येईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.