24 February 2019

News Flash

‘गुगल’ देणार मराठीला बळ

गतवर्षी गुगल सर्च संमेलन पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रादेशिक भाषांसाठीच्या ‘गुगल सर्च संमेलना’त मराठीचाही समावेश

समाजमाध्यमांमध्ये प्रादेशिक भाषांचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगलने ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भाषांतील साहित्य आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवू पाहणाऱ्या प्रकाशक आणि लेखकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यंदा प्रथमच मराठीचा या सर्च संमेलनामध्ये समावेश करण्यात आला असून, २२ जूनला पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषा आणि साहित्याला बळ मिळणार आहे.

गतवर्षी गुगल सर्च संमेलन पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत इंग्रजी आणि हिंदी भाषांसाठीचे संमेलन झाले. यंदा हिंदी, इंग्रजीसह तेलुगू, तमिळ, बंगाली आणि मराठी या चार प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या भाषांतील लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, प्रादेशिक भाषांतील वेब डेव्हलपर्स, मराठीशी संबंधित व्यावसायिकांशी गुगल या संमेलनामध्ये संवाद साधणार आहे. गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून प्रादेशिक भाषांतील साहित्य कसे पोहोचवता येईल याचा उहापोह या संमेलनात होईल. संमेलनातील कार्यशाळा पुण्यासह दिल्ली, इंदोर, पाटणा, लखनौ, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोलकाता, कोइमतूर, चेन्नई, बेंगळुरू या शहरांतही  होणार आहेत.

या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. प्रवेश अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यशाळेच्या सदस्यांची निवड गुगलकडून केली जाणार आहे.  https://goo.gl/Fsbzuu या दुव्यावर कार्यशाळेचा नोंदणी अर्ज उपलब्ध आहे.

अर्थार्जनासाठीही मार्गदर्शन

अनेक तरूण लेखक ब्लॉग, पुस्तके, संकेतस्थळांच्या माध्यमातून लेखन करत असतात. आपल्या ‘अ‍ॅडसेन्स’ या फिचरच्या माध्यमातून समाजमाध्यमांतील लेखकांना जाहिरात मिळवून देण्याचा प्रयत्न गुगल करणार आहे. त्या बाबतचे मार्गदर्शनही कार्यशाळेत केले जाणार आहे. लेखनातून अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरणार आहे.

First Published on June 13, 2018 2:34 am

Web Title: google marathi google search sammelan