अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी सोमवारी

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या वाढीव मुदतीत एकूण २१ हजार मतदार वाढले आहेत. त्यापैकी पदवीधरसाठी १५ हजार २२२ आणि शिक्षक मतदार संघात सहा हजार ६४७ मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, या दोन्ही मतदार संघांची अंतिम मतदारयादी येत्या सोमवारी (३० डिसेंबर) प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप मतदारयादीनुसार पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघात अनुक्रमे ५९ हजार ४२१ आणि १८ हजार ७१४ मतदारांचे अर्ज आले होते. त्यापैकी पदवीधरसाठी ४७ हजार ५९४ आणि शिक्षक मतदार म्हणून १३ हजार ८३३ जणांची नोंदणी झाली होती. पदवीधर, शिक्षक मतदार यादी निरंतर अद्ययावत करण्याची तरतूद असल्याने २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत पुन्हा नोंदणीसाठी मुदत दिली होती. त्यानुसार पदवीधरसाठी १५ हजार २२२ मतदारांची भर पडून एकूण मतदार ६२ हजार ८१६ झाले आहेत, तर शिक्षकसाठी सहा हजार ६४७ मतदारांची भर पडली असून एकूण मतदार २० हजार ४८० एवढे झाले आहेत. तसेच या दोन्ही मतदार संघांसाठी दावे, हरकती स्वीकारण्याची मुदतही संपली आहे. दरम्यान, पदवीधर, शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका जुलै २०२० मध्ये होणार आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.

दोन्ही मतदार संघांत नोंदणी कमी

सन २०१४ मध्ये झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकांसाठी अनुक्रमे एक लाख ६२ हजार २१३ आणि ४७ हजार ६४ मतदार होते. यंदा पदवीधरसाठी आतापर्यंत ६२ हजार ८१६ आणि शिक्षक मतदारसंघासाठी २० हजार ४८० मतदारांनी नोंदणी केली आहे. पदवीधरसाठी गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल ९९ हजार ३९७, तर शिक्षक मतदार संघात २६ हजार ५८४ एवढय़ा संख्येने मतदार घटले आहेत. परिणामी पुरवणी यादी तयार करेपर्यंत अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

फारसा प्रतिसाद नाही

पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले, तरीही संबंधित मतदारांना मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी देखील नव्याने मतदार म्हणून नावनोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबपर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत पुन्हा नोंदणीसाठी मुदत दिली होती. मात्र, पुणे विभागातील पाचही जिल्ह्य़ांमधील मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही.