महापालिकेच्या उद्यानांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी आजी-आजोबा व नातवंडांना एकत्र आणण्याचा अभिनव उपक्रम सुरू होत असून अनेक आजी-आजोबांनी या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्या भागातील नातवंडांना गोष्टी सांगण्याचे, तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून संस्कार करण्याची तयारी दर्शवली आहे.
शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात नाते तयार व्हावे, उमलत्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हा उपक्रम सुरू केला जात असून महापालिका उद्यानांमध्ये शनिवार व रविवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत नातवंडे व आजी-आजोबा एकत्र येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात सहकारनगरमधील बागूल उद्यानात केली जाणार आहे. या निमित्ताने या भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही एकत्र केले जाणार असून उपमहापौर आबा बागूल यांची ही संकल्पना आहे. अनेक स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत मुलांशी संवाद साधण्यासाठी येण्याचे मान्य केले आहे.
महापालिका उद्यानांमध्ये आठवडय़ातून दोन दिवस शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र यावे, खेळ खेळावेत, गोष्टी ऐकाव्यात, गोष्टी सांगाव्यात, चांगल्या संस्कारांचे, वागणुकीचे धडे घ्यावेत, पाठांतर करावे, गाणी म्हणावीत, गाणी ऐकवावीत आणि हे सारे आजी-आजोबांच्या उपस्थितीत करावे अशी ही संकल्पना असून या निमित्ताने मुलांचे आणि आजी-आजोबांचे नाते तयार व्हावे असाही प्रयत्न आहे. उमलत्या पिढीवर असणारे संस्कारांचे महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमात मुलांवर संस्कार होतील अशा पद्धतीचेही कार्यक्रम योजले जाणार असल्याचे बागूल यांनी सांगितले. सामाजिक कामांची आवड असणाऱ्या मंडळींनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.