पोलीस आयुक्तालयातील बांधकामामुळे सभागृहाबाहेर राडारोडा

पुणे : पोलीस आयुक्तालयातील इमारतीत नवनवीन बदल होत असताना मंगळवारी आयुक्तालयात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरू झालेल्या ‘सेवा’ कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपस्थितांची गैरसोय झाली. कार्यक्रम सुरू असताना पोलीस आयुक्तालयातील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर फरशा बसविणे, भिंत बांधणी तसेच अन्य कामे सुरू होती. बांधकामाच्या राडारोडय़ातून वाट काढत नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.

गेल्या वर्षभरापासून पोलीस आयुक्तालयातील अनेकविध विकासकामे सुरू आहेत. तिसऱ्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या नवीन सभागृहात मंगळवारी ‘सेवा’कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राज्याचे निवृत्त मुख्य सचिव आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात जाण्यासाठी दोन जिने आहेत. त्यापैकी एक जिना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वापरासाठी असून दुसरा जिना कर्मचाऱ्यांसाठी आहे. कर्मचारी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नागरिक दुसऱ्या जिन्याने सभागृहात आले. उद्घाटन सोहळा सुरू असताना तिसऱ्या मजल्यावर फरशी टाकणे, भिंत उभारणी अशी कामे सुरू होती.

जिन्यात राडरोडा पडलेला असल्याची माहिती वरिष्ठांना नव्हती. त्यामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले नागरिक तसेच पोलीस कर्मचारी राडरोडा पडलेल्या जिन्यातून वाट काढत सभागृहात दाखल झाले. जिन्यात वेल्डिंगचे काम सुरू असल्याने अनेकांनी दबकत सभागृहात प्रवेश केला. वरिष्ठांसाठी असलेल्या जिन्याची अनेकांना माहिती नसल्याने तिसऱ्या मजल्यावर उद्घाटन सोहळा असल्यासारखे वातावरण दिसत नव्हते. कार्यक्रम सुरु असताना बांधकाम मजुरांकडून करण्यात येणाऱ्या कामामुळे वारंवार व्यत्यय येत होता. मात्र, व्यासपीठावर असणाऱ्या वरिष्ठांना याची माहिती देखील नव्हती.

अधिकाऱ्यांसाठी असलेल्या जिन्यात बंदोबस्त

अधिकाऱ्यांसाठी असलेल्या जिन्यातून तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दरवाज्यात एका महिला पोलीस निरीक्षकाला बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. त्या महिला अधिकाऱ्याच्या आठमुठेपणामुळे सामान्यांना सभागृहात प्रवेश करता आला नाही.