लघुरूपातील ऑर्गनला संवादिनीचे रूपडे

संगीत नाटक आणि नाटय़संगीताच्या मैफलीची गोडी वाढविणारे ऑर्गन हे वाद्य आता अपंग व्यक्तीच्या वादनासाठी सुलभ होणार आहे. मांडी घालून बसलेला कलाकार दोन्ही हातांनी हा ऑर्गन वाजवू शकेल. मूळ ऑर्गन वाद्य मोठे असल्याने प्रवासामध्ये ने-आण करण्याच्या दृष्टीने सुकर अशा या वाद्याला संवादिनीचे रूपडे देत लघुरूपात आणण्याच्या उमाशंकर ऊर्फ बाळा दाते यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गुढीपाडव्यापर्यंत लघुरूपातील ऑर्गनवादकांना उपलब्ध होणार आहे.

कोकणातील आडिवरे (जि. रत्नागिरी) येथील बाळा ऑर्गन अँड म्युझिकल्सचे उमाशंकर दाते यांनी ऑर्गन या वाद्याचा आणि ऑर्गनमधील ‘रीड’चा त्यातील बारकाव्यांसह अभ्यास केला आहे. ऑर्गनमध्ये काळानुरूप बदल करीत हे वाद्य त्यांनी पाश्चात्त्य बनावटीच्या रीडसचा वापर करून नव्या पद्धतीचा ऑर्गन आकाराला आणला आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी ७५ ऑर्गनची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध संवादिनीवादक आदित्य ओक आणि राहुल गोळे यांनी दाते यांच्याकडूनच ऑर्गन खरेदी केला आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटामध्ये शंकर महादेवन यांच्या स्वरांतील ‘मन मंदिरा’ या गीतामध्ये दाते यांच्या ऑर्गनचा उपयोग करण्यात आला आहे. हिंदूी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार विशाल भारद्वाज यांनी दोन महिन्यांपूर्वी दाते यांच्याकडून ऑर्गनची खरेदी केली आहे. आगामी हिंदूी चित्रपटाच्या संगीतामध्ये ते या ऑर्गनच्या सुरांचा वापर करणार आहेत, असे दाते यांनी सांगितले. संगीतअभ्यासक आणि ऑर्गनवादक असलेले उमाशंकर दाते राजापूर हायस्कूल येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ऑर्गन वाद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत.

ऑर्गनला लघुरूप देण्याच्या प्रयत्नांबाबत दाते म्हणाले, परदेशी बनावटीचे वाद्य असलेल्या ऑर्गनला संगीत नाटकांमध्ये आणि नाटय़संगीताच्या मैफलीमध्ये मानाचे स्थान लाभले आहे. संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले यांच्यासारख्या संगीत जाणकारांनी ऑर्गनला हक्काचे स्थान दिले. पारंपरिक भजनी मंडळे आणि तमाशा फडांनीही ऑर्गनला आपलेसे केले. हा ऑर्गन आकाराने मोठा आणि वजनाने जड आहे. त्यामुळे प्रवासामध्ये ऑर्गनची ने-आण करणे अवघड आणि खर्चिक होऊन बसते. ही बाब ध्यानात घेऊन आणि अपंग कलाकारालाही हे वाद्य वाजविता आले पाहिजे या उद्देशातून ऑर्गनला संवादिनीसारखे करता येईल हा विचार सुरू झाला.

सध्या ऑर्गन वाजविताना दोन्ही हातांबरोबरच पायांचाही वापर करावा लागतो. नव्या स्वरूपातील ऑर्गनमध्ये इलेक्ट्रिक मोटारचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑर्गनचे वादन करताना पाय मारण्याचे काम मोटार करेल आणि कलाकार केवळ दोन हातांचा वापर करून संवादिनी वादन करतात त्याप्रमाणे ऑर्गनचे वादन करू शकेल. या ऑर्गनची निर्मिती सुरू असून त्याला यश आले आहे. ऑर्गनची रचना आणि आवाजाचा पोत या गोष्टींची चाचणी करून लवकरच म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत हा ऑर्गन वादनासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.