शुक्रवारचा दिवस…. दुपारी त्यांनी नेहमीप्रमाणे आपली नमाज अदा केली आणि आपल्या कामावर जायला निघाले. मात्र, आज त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. कामावर जात असताना जुना बाजाराच्या चौकात ते सिग्ननला थांबले. त्याचक्षणी त्यांच्या अंगावर लोखंडी होर्डिंगचा मोठा सांगाडा कोसळला अन… क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पुण्यातील जुना बाजार परिसरात कोसळलेल्या होर्डिंगच्या सांगाड्यामुळे ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली यात जावेद खान यांचाही समावेश आहे. जावेद यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, जावेद खान (वय ४८, रा. घरकुल, पिंपरी-चिंचवड) यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. लक्ष्मी रोडवरील मेन्य अव्हेन्यू या कपड्यांच्या मोठ्या दालनात ते कामाला होते. दर, शुक्रवारी जावेद जुना बाजार येथील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी येत असत. आज देखील नेहमीप्रमाणे ते नमाज अदा करून दुकानात कामावर निघाले होते. त्यानंतर ते जुना बाजारच्या चौकात सिग्नलला थांबले. त्यानंतर ही भीषण घटना घडली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. जावेद यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हा प्रसंग सांगितला.

मात्र, त्यांच्या मागे असलेल्या चार मुलांचा आणि पत्नीचा मुख्य आधार हिरावला आहे. अल्लाहकडे सर्वांसाठी दुवा मागतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जुना बाजार भागातील शाहीर अमर शेख चौकात अनेक मोठे होर्डिंग लावण्यात आले असून यातील एका होर्डिंगचा मोठा लोखंडी सांगाडा दुपारी सिंग्लला थांबलेल्या वाहनांवर कोसळला. दुपारी लोखंडी होर्डिंगचे कटिंग सुरु असताना ही घटना घडली. या होर्डिंगखाली एकूण ११ जण सापडले होते. यातील चौघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.