पदाचा दुरुपयोग करून एखादा गैरव्यवहार करायचा, तो खपला तर त्याचे लाभ मिळवायचे आणि नाही खपला, तर संबंधितांवर जबाबदारी ढकलून त्यांना दोषी धरायचे, या राजकारण्यांच्या ‘पॅटर्न’चा फटका महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांना बसला आहे. विशेष म्हणजे शिक्षण प्रमुख आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले म्हणून हे मुख्याध्यापक आता अडचणीत आले आहेत.
महापालिका शाळांमधील कुंडय़ांची खरेदी सध्या पुण्यात गाजत आहे. बाजारात शंभर रुपयांना मिळणारी कुंडी एक हजार रुपयांना एक या दराने खरेदी केल्याच्या या प्रकरणात शिक्षण प्रमुखांना दोषी धरण्यात आले असून त्यांना महापालिका आयुक्तांनी कार्यमुक्त  केले आहे. मात्र, कुंडय़ांच्या खरेदीचे लेखी आदेश शिक्षण प्रमुख तुकाराम सुपे आणि मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी यांनीच मुख्याध्यापकांना दिले होते. त्यानुसार हितसंबंधी ठेकेदार शाळांमध्ये पोहोचला आणि त्याने जादा दराच्या कुंडय़ा शाळांमध्ये पोहोचवल्या. वरून आलेल्या आदेशानुसार मुख्याध्यापकांनी ही प्रक्रिया पार पाडली. ही प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडावी यासाठी मुख्याध्यापकांच्या नावांचे तीनशे धनादेशही तयार होते. ते वटवून ठेकेदाराला तातडीने पैसे देण्याचेही आदेश होते. त्यानुसार काही मुख्याध्यापकांनी प्रक्रिया पार पाडली.
अशा प्रकारे झालेला कुंडय़ा खरेदीतील गैरव्यवहार उजेडात येताच खरेदी थांबवण्यात आली. मात्र, गैरव्यवहार बाहेर येताच आता मंडळाच्या अध्यक्षांनी खरेदी मुख्याध्यापकांनी केली आहे, खरेदीचा व्यवहार मुख्याध्यापक व ठेकेदार यांच्यात झाला आहे, असा पवित्रा घेत सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांवर ढकलली आहे. ही खरेदी प्रक्रिया जून महिन्यात अपेक्षित होती. मात्र काही एजन्सींनी काही शाळांमध्ये जाऊन कुंडय़ा विकण्याचा प्रयत्न केला व गोंधळ घालून भ्रष्टाचार केला, असाही दावा अध्यक्ष करत आहेत. असा प्रकार झाल्याचे दिसल्यानंतर तुम्ही काय केलेत, कोणाची चौकशी केली का, शाळाशाळांमध्ये कोण जात होते, त्यांच्यावर काही कारवाई करणार का, असे प्रश्न अध्यक्षांना विचारल्यानंतर, सध्या सुटी सुरू आहे. जून महिन्यात शाळा उघडल्यानंतर या प्रकाराची चौकशी करू, असे सांगितले जात आहे.
शिक्षण प्रमुखांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे मुख्याध्यापकांना बंधनकारकच होते. त्यानुसार त्यांनी आदेशाचे पालन केले. मात्र, गैरव्यवहार बाहेर येताच तो आमचा प्रश्न नाही; व्यवहार मुख्याध्यापक व एजन्सीमध्ये झाला आहे. त्याला आम्ही जबाबदार कसे, अशी विचारणा अध्यक्ष करत आहेत. त्यामुळे एकीकडे आदेशाचे पालन करण्याची सक्ती आणि गैरप्रकार बाहेर येताच त्याला मुख्याध्यापक जबाबदार असा प्रकार मुख्याध्यापकांबाबत झाला आहे.