News Flash

पुण्याला हृदयविकाराचा विळखा!

पुणे शहराला हृदयविकाराचा विळखा बसत असून गेल्या तीन वर्षांत हृदयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

हृदयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढले; तरुणांची संख्याही लक्षणीय

पुणे शहराला हृदयविकाराचा विळखा बसत असून गेल्या तीन वर्षांत हृदयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीत हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण तर दुपटीने वाढले आहे. २०१५-१६ या वर्षांत तर हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मृत्यू होणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

pun03पालिकेच्या जन्म व मृत्यू कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पुण्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत विविध प्रकारच्या हृदयरोगांमुळे तब्बल ५,७४१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. हीच संख्या २०१३-१४ मध्ये २,६६०, तर २०१४-१५ मध्ये २,७३९ होती. सर्वच वयोगटात हृदयरोगामुळे झालेल्या मृत्यूमध्ये या वर्षी वाढ झालेली दिसत असून त्यात तरुणांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या वर्षी २० ते ४० या वयोगटातील २५६ जणांना हृदयरोगामुळे जीव गमवावा लागला आहे.

‘मृत्यूची संख्या अधिक दिसत असली तरी शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमुळेही तसे असू शकेल. गेल्या दहा वर्षांमध्ये हृदयरोगाचे निदान आणि शस्त्रक्रिया वाढल्या असून त्यात अचूकता आली आहे, शिवाय उपचारांना येणारे यशही वाढले आहे,’ असे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले.

यासंदर्भात डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, ‘‘अगदी २२ वर्षांच्या तरुणांपासून हृदयविकाराचा झटका आल्याचे बघायला मिळाले आहे. लहान वयातच नेहमी फास्ट फूड खाणे, मैदानी खेळ न खेळणे, अशी जीवनशैली सुरू होते. हे टाळून आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात केल्यास आरोग्य चांगले राहील.’’

जीवनशैलीत झालेले विपरीत बदल, सिगारेट व तंबाखूचे सेवन, प्रचंड ताण या गोष्टी तरुणांमधील हृदयरोगासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरू शकतात. मधुमेह व उच्च रक्तदाबाचे प्रमाणही तरुणांमध्ये वाढले असून त्यामुळेही हृदयरोग उद्भवू शकतो. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक उदाहरणे बघायला मिळाली आहेत.

– डॉ. सजीव जाधव, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 3:18 am

Web Title: heart attack cases more in pune
Next Stories
1 पोलीस वसाहतीत सापांचा सुळसुळाट
2 नागपूरच्या हल्दीरामला पुणेरी झटका
3 पिंपरीच्या आयुक्तांना अखेर आदेश मिळाले!
Just Now!
X