पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. ही स्थिती गुरुवारपर्यंत (२५ मार्च) कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात इतरत्रही आता हवामान कोरडे होणार असल्याने तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे गेल्या चार ते पाच दिवसांत राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.  गुरुवारपासून राज्यात सर्वच भागात हवामान कोरडे होणार आहे. कोकण विभागात बुधवारी तापमानात मोठी वाढ झाली. या भागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे तापमान ७.२ अंश सेल्सिअसने अधिक आहे. मुंबई परिसरात सांताक्रुझ केंद्रावर ३८.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ५.३ अंशांनी अधिक आहे. गुरुवारीही या भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहणार आहे.