ढोल-ताशांचा दणदणाट, भव्य चित्ररथ, शालेय पथके, विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, गुलालाऐवजी फुलांचा व भंडाऱ्याचा वापर, महिलांचा लक्षणीय सहभाग अशी वैशिष्टे कायम ठेवत उद्योगनगरीतील मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ऐन मोक्याच्या वेळी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व मुसळधार पावसाने मंडळांच्या उत्साहावर पुरते पाणी पडले. मिरवणुका पुढे नेण्याच्या मुद्दय़ावरून मंडळे व पोलिसांमध्ये तसेच मंडळा-मंडळांमध्ये अनेकदा बाचाबाची झाली. तथापि, मिरवणुका शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळी घरगुती गणपतींचे विसर्जन झाले व दुपारी साडेबारापासून सार्वजनिक मंडळांचे गणपती मिरवणुकांद्वारे बाहेर पडले. चिंचवड येथे चापेकर चौक व िपपरीत कराची चौकात पालिकेने उभारलेल्या स्वागत कक्षात मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. महापौर मोहिनी लांडे, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, आमदार अण्णा बनसोडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, माजी महापौर अपर्णा डोके आदी उपस्थित होते. अनेक संस्था-संघटनांनी स्वागताचे व जनजागृतीचे फलक लावण्याबरोबरच पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. चिंचवडच्या मिरवणुका साडेअकरा तास तर िपपरीतील मिरवणुका सव्वा बारा तास चालल्या. भव्य चित्ररथ व आकर्षक सजावटी करण्यावर मंडळांचा भर होता. याही वर्षी मंडळांनी गुलालाऐवजी फुलांचा व भंडाऱ्याचा वापर केला. मिरवणुका लवकर संपवण्याच्या हेतूने पोलीस कार्यकर्त्यांना पुढे ढकलत होते. यावरून पोलीस व मंडळांमध्ये अनेकदा खडाजंगी उडाली. त्याचप्रमाणे, एकमेकांना पुढे जाऊ न देण्याच्या मंडळांच्या चढाओढीतून वाद होत होते. दापोडीतील मिरवणुकांमध्ये पोलीसच दारू पिऊन आले, अशा तक्रारी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केल्या. रात्री बारा वाजता पोलिसांना वाद्ये वाजवण्यास बंदी केली, तेव्हा पारंपरिक वाद्ये वाजवू द्या, असा आग्रह मंडळांनी धरला, त्यावरून पुन्हा पोलीस व मंडळांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मात्र शहरातील मिरवणुका शांततेत पार पडल्याचे सांगितले. या दरम्यान धो-धो पाऊस सुरू झाला, त्यात तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र, तरीही भर पावसातही गणेशभक्त मिरवणुकांचा आनंद घेत होते.

‘लुंगी डान्स, कोंबडी पळाली आणि रिक्षावाला..’
सजावट विरहत मंडळांनी स्पीकरच्या भिंती लावून मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद लुटला. ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील ‘लुंगी डान्स’ या गाण्याने सर्वाधिक कहर केला. याशिवाय, ‘एबीसीडी’मधील ‘गणेश देवा’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘कोंबडी पळाली’, गोरी मांडवात आली’ ‘बटर फ्लाय’, ‘ललाटी भंडार’, ‘नाद करायचा नाय’, ‘एक-दोन-तीन’ या सदाबहार गाण्यांना मंडळांची पसंती होती.