मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहनांची नोंद करताना विविध कागदपत्रांमध्ये आणखी एका कागदाची भर पडली असून, हा नवा कागद दुचाकी मालकाकडून हेल्मेटच्या वापराबाबत घेण्यात येणारे प्रतिज्ञापत्र आहे. ‘भविष्यात मी हेल्मेट घेईन व वापरेन’ अशा आशयाचे हे प्रतिज्ञापत्र आहे. मात्र, दुचाकी रस्त्यावर आल्यानंतर खरोखरच संबंधिताने हेल्मेट घेतले व तो ते वापरतोय काय, हे कुठेही तपासले जात नसल्याने हे प्रतिज्ञापत्र केवळ सोपस्कार ठरते आहे.
दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तीन महिन्यांपूर्वी भाष्य केले होते. दुचाकी चालविणारा व मागे बसलेल्या दोघांनीही हेल्मेट वापरलेच पाहिजे, अशी भूमिका शासनाने घेतली होती. त्यामुळे हेल्मेट न वापरणाऱ्यांवर पुण्यात वाहतूक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात आली. सुमारे आठवडाभर शहरातील मुख्य चौकांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही हेल्मेटची कारवाई सुरू असल्याचे चित्र दिसत होते. पुण्यातील काही मंडळींनी हेल्मेट सक्ती व त्याविषयीच्या कारवाईला तीव्र विरोध केला. त्यानंतर ही कारवाई शिथिल करण्यात आली. पण, वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करताना पकडल्यास हेल्मेट न घातलेल्या दुचाकी चालकाला हेल्मेटबाबतचा दंडही आकारला जातो.
हेल्मेट सक्तीविषयीच्या कारवाईच्या कालावधीतच ‘आरटीओ’मध्ये नव्या दुचाकी नोंदणीच्या प्रक्रियेत एका नव्या कागदाची वाढ करण्यात आली. नवीन दुचाकीची नोंदणी करताना त्या दुचाकीच्या मालकाकडून हेल्मेट वापराबाबत केवळ प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. स्वत:बरोबरच दुचाकीवर मागे बसणाऱ्यासाठी मिळून दोन हेल्मेट घेईन व त्याचा वापर करेन, असे दुचाकी मालकाकडून लेखी घेतले जाते. या प्रतिज्ञापत्राशिवाय दुचाकीची नोंदणी केली जात नाही.
मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घोटोळे यांनी याबाबत सांगितले, की दुचाकी घेताना हेल्मेट नसले, तरी भविष्यात हेल्मेट घेऊन ते वापरले जाईल, यासाठी दुचाकीच्या मालकाकडून लेखी घेतले जात आहे. केवळ प्रतिज्ञापत्र लिहून घेत आरटीओचे काम संपते. प्रत्यक्षात दुचाकीस्वार हेल्मेट वापरतो की नाही, हे पाहिले जात नाही. त्यामुळे केवळ प्रतिज्ञापत्र भरून घेऊन काहीही उपयोग होत नाही. हेल्मेटच्या सक्तीबाबत शासन खरोखरच गंभीर असेल, तर केवळ प्रतिज्ञापत्र न घेता दुचाकी उत्पादकांनाच दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याची सक्ती करावी. त्यामुळे हेल्मेट वापर वाढण्यास मदत हेऊ शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2016 रोजी प्रकाशित
हेल्मेटबाबत ‘आरटीओ’कडून केवळ प्रतिज्ञापत्राचे सोपस्कार
मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहनांची नोंद करताना विविध कागदपत्रांमध्ये आणखी एका कागदाची भर पडली असून...
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-04-2016 at 03:19 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmets rto affidavit procedure