स्वच्छ पाण्यात तयार होणाऱ्या डासांच्या मदतीने पसरणाऱ्या डेंग्यू या तापाचे या वर्षांतील सर्वाधिक रुग्ण पुणे, ठाणे आणि कोल्हापूर विभागात आढळले असून पावसाळ्याच्या आगमनाबरोबर डेंग्यूच्या तापाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबत माहिती दिली. पुणे, ठाणे आणि कोल्हापूर विभागात १ जानेवारी २०१९ पासून १५ जुलैपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. कोल्हापूर विभागात ३१६, पुणे विभागात ३३० तर ठाणे विभागात ३०६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर विभागात दोन रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

पावसाळ्याच्या आगमनाबरोबर इतर विषाणूजन्य आजारांच्या बरोबरीने राज्यात डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण देखील आढळण्यास सुरुवात झाली आहे. ही लागण टाळण्यासाठी परिसराची स्वच्छता राखणे, डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले.

औरंगाबाद विभागात डेंग्यूचे प्रमाण नियंत्रणात आहे. तेथे वर्षभरातील सर्वात कमी म्हणजे १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. अकोल्यात २८, नाशिक विभागात ४९, नागपूरमध्ये ७९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर विभागामध्ये १०७ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. रवींद्र छाजेड म्हणाले, गेल्या आठवडय़ाभरात डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या अत्यंत कमी, मात्र रुग्णाची वैद्यकीय स्थिती स्थिर आहे. काही रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या उत्तम असून देखील लक्षणे अत्यंत वाईट आहेत हे यंदा आढळणाऱ्या रुग्णांचे वैशिष्टय़ आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करून पूरक उपचार देण्यात येत आहेत. किवी, ड्रॅगन फ्रूट, पपईच्या पानांचा रस यांमुळे प्लेटलेट वाढतात याला कोणताही शास्त्रीय पुरावा नसल्याने रुग्णांनी त्यावर अवलंबून राहू नये. डॉक्टरांकडे जाईपर्यंत आराम वाटावा म्हणून औषध घ्यायचे असल्यास केवळ पॅरासिटॅमॉल घ्यावे. अ‍ॅस्पिरिन, ब्रुफेन ही औषधे घेतल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका संभवतो.

काय खबरदारी घ्यावी?

*  खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी लावावी.

*  घर, गच्ची, परिसरात पाणी साठणार नाही असे पहावे.

*  पाण्याचा अतिरिक्त साठा करू नये.

*  पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावावीत.

*  खराब टायर, झाडांच्या कुंडय़ा, फुलदाण्या यात पाणी साठणार नाही असे पहावे.