झोपडपट्टी परिसरातील अकरा ते अठरा वयोगटातील मुलींची तपासणी करून ज्या मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल अशा मुलींना पोषक आहार देण्याचा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुरू करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये या उपक्रमांतर्गत एक हजार मुलींची तपासणी केली जाणार असून त्यांना औषधे व पोषक आहारही दिला जाणार आहे.
प्रभाग २१ मधील महात्मा फुले शाळेतील मुलींची तपासणी करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्थानिक नगरसेविका वनिता वागसकर आणि बाबू वागसकर यांनी हा उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत २८० मुलींची तपासणी पूर्ण झाली आहे. बहुसंख्य मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्याचे वनिता वागसकर यांनी सांगितले. तपासणी केल्या जाणाऱ्या प्रत्येक मुलीला आरोग्य कार्ड दिले जाणार असून प्रत्येक तपासणीच्यावेळी या कार्डावर हिमोग्लोबिनची नोंद केली जाईल.
प्रभागातील कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, दरोडे मळा, कवडे वस्ती, लोकसेवा वसाहत, उल्हासनगर या वस्त्यांमध्येही मुलींची तपासणी सुरू करण्यात आली असून हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मुलींना खजूर वगैरे पोषक आहाराबरोबरच एक महिन्याचे औषधही विनामूल्य दिले जाणार आहे. हा उपक्रम कायमस्वरुपी राबविण्याचीही योजना असल्याचे वागसकर म्हणाल्या. डॉ. वंदना माने, डॉ. नाईक, डॉ. खिंवसरा, अजय कदम, विजय आवारे, विक्रांत भिलारे आदींनी या उपक्रमाला साहाय्य केले आहे.