रिक्षा चालकाने पैसे जास्त घेतले, रिक्षा चालक भाडे नाकारतात, रिक्षा चालकाने फसवले.. अशाच प्रकारचे किस्से कानावर पडत असतात. पण रिक्षात राहिलेली बॅग परत करून रोहित एकावडे या रिक्षा चालकाने एक नवा आदर्श समोर आणला आहे.
एस. आर. कुलकर्णी यांनी आनंदनगर ते भुसारी कॉलनी असा प्रवास एकावडे यांच्या रिक्षाने केला. ज्या ठिकाणी जायचे होते, तेथे उतरल्यानंतर आपली बॅग जवळ नसल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आले. मात्र, तो पर्यंत रिक्षा निघून गेली होती. रिक्षात राहिलेल्या बॅगमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे, पावत्या, मोबाइल आणि रोख रक्कम होती. रिक्षात बॅग राहिल्याचे लक्षात आल्यानंतर एकावडे यांनी बॅगमधील मोबाइलवरून कुलकर्णी यांच्या भावाला फोन केला. त्यांच्या भावाने कुलकर्णी यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक दिल्यानंतर एकावडे यांनी त्यांना संपर्क साधून कुलकर्णी यांची बॅग त्यांच्या राहत्या पत्त्यावर पोहोचवली. पैसे व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन आलेल्या एकावडे यांना कुलकर्णी यांनी बक्षिशी देऊ केली. मात्र, एकावडे यांनी ती नम्रपणे नाकारली.