नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण

कडाक्याच्या थंडीच्या मोसमात भोसरीतील सहल केंद्रात जमिनीतून मात्र गरम पाणी बाहेर येत असल्याचा प्रकार बुधवारी दिसून आला. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर हे गूढ समजून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली. उशिरापर्यंत या घटनेमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

भोसरीत महापालिकेचे मोठे उद्यान असून ‘सहल केंद्र’ म्हणून ते सर्वपरिचित आहे. दररोज सकाळी काही नागरिक व्यायामासाठी या ठिकाणी येतात. बुधवारी सकाळी काही नागरिकांना उद्यानातील एका बाजूला साचलेल्या पाण्यातून वाफा बाहेर येत असल्याचे दिसले. जवळ जाऊन त्यांनी पाहणी केली असता, उकळते पाणी बाहेर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूचे पाणी थंड होते. मात्र, एकाच ठिकाणातून गरम पाणी बाहेर पडत होते. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही नागरिकांनी या गरम पाण्यात प्लास्टिकची बाटली बुडवून पाहिली, तेव्हा ती वितळून गेल्याचे दिसून आले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी ही माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना दिली व त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना कळवले.

जमिनीतून गरम पाणी बाहेर येत असल्याची माहिती बाहेर पसरली. समाजमाध्यमांवरही प्रसारित झाली. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चाना व अफवांना उत आला. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी येथून जाणाऱ्या विजेच्या तारांची पाहणी केली. तसेच पालिकेचे अधिकारी देखील याबाबतची माहिती घेत होते. उशिरापर्यंत या घटनेमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, भूगर्भशास्त्रज्ञांनी या प्रकाराची माहिती घ्यावी व संबंधित घटनेचे वास्तव उघड करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.