जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना हरताळ; दर आठवडय़ाला आढावा घेण्यात येणार

पुणे : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम शहरासह जिल्ह्य़ात राबवण्?यात येत आहे. त्या अंतर्गत गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशांची मतदारांची नोंदणी, दुरुस्ती, दुबार व मयत नावे वगळणे अशा कामांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अद्याप गृहनिर्माण संस्थांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सहकारी सोसायटय़ांनी मतदार यादी अद्ययावतीकरणात ‘असहकार’ पुकारल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही हरताळ फासला गेला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्य़ात मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि नावे वगळणे ही कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घोषणेच्या पाश्र्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांची १९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेतली. गृहनिर्माण संस्थांकडून आलेल्या यादीनुसार मतदार यादी अद्ययावत झाली किंवा कसे? याबाबत दर आठवडय़ाला आढावा घेण्यात येईल, असे या बैठकीत राम यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, अशाप्रकारचा अभिनव उपक्रम प्रथमच राबवला जात आहे. मतदार यादी अद्ययावत करण्?यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्?या पाश्र्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील महत्त्वाच्या भागात बैठका घेण्यात येणार आहेत. शहरात १६ हजार ३६० गृहनिर्माण संस्था असून सहा उपनिबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या क्षेत्रातील मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, गृहनिर्माण संस्थांकडून मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

गृहनिर्माण संस्थांनी करावयची कामे

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम शहरासह जिल्ह्य़ात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मतदारांची नोंदणी, दुरुस्ती, दुबार व हयात नसलेल्यांची नावे वगळणे याबाबत कार्यवाही सुरू आहे. गृहनिर्माण संस्थांची निवडणूकविषयक कामकाजात मदत होण्यासाठी आणि सोसायटय़ांमधील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित संस्थांचे अध्यक्ष, सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे. गृहनिर्माण संस्थेतील नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे आणि मतदार यादीतील सध्याची नावे, पत्ता, छायाचित्रांमधील दुरुस्ती अशी कामे करणे अपेक्षित आहे.