मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) कार्यक्रमात चालू भाषणात तुम्ही हे बोलू नका असं सांगून अनेक अडथळे आणले गेले, औचित्यभंगाचं कारण पुढे करुन मला भाषण करु दिलं नाही. एखाद्या वक्त्यानं काय बोलावं काय नाही याची माहिती त्याला आधी द्यायची असते, मात्र मला तसं सांगण्यात आलं नव्हतं. मात्र, एनजीएमएधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांवर बोलणं हे औचित्यभंग कसं असू शकतं? असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संध्या गोखले या देखील उपस्थित होत्या.

एनजीएमए येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे कलाविश्वासोबतच विविध क्षेत्रातून कार्यक्रमाच्या आयोजकांवर टीका होऊ लागली आहे. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते. शनिवारी हा संतापजनक प्रकार घडला होता.

पालेकर म्हणाले, परवा एनजीएमए नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रभाकर बर्वे या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराच्या कलेला उजाळा देण्याचं काम सुरु होतं. तिथं मला वक्ता म्हणून बोलावण्यात आलं होतं. यावेळी हा कार्यक्रम बर्वेंसंदर्भात असल्याने त्यावरच बोलावं सरकारवर टीका करु नये, असं मला कार्यक्रमाच्या प्रमुखांकडून सांगत औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन माझ्या भाषणात अनेकदा अडथळे आणले गेले. ही संस्था आणि त्यामध्ये आता झालेले बदल यावर मी बोलण हे औचित्यभंग कसं आहे हे मला कळत नाही. त्यामुळे या मंचावरुन हे बोलू नये, असं सांगण हे चुकीच आहे.

बर्वेंच्या कलेचा हा सिंहावलोकनाचा कार्यक्रम या वास्तूमध्ये शेवटचा कार्यक्रम असणारं अस आम्हाला समजलं होतं. या संस्थेच्या नव्या संचालिकांनी कारभार सांभाळल्यानंतर नवं धोरण आणण्यात आणलं आहे. त्यानुसार पाचही मजल्यांमध्ये होणाऱ्या कलाकारांच्या चित्रांच्या प्रदर्शन आता भरवता येणार नाही. पहिल्या चार मजल्यांवर एनजीएमएमधील चित्रांचेच प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तर वरच्या शेवटच्या पाचव्या मजल्यावरील डोममध्ये बाहेरच्या कालाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हा पाचवा मजला खूपच छोटा असल्याने या नव्या धोरणामुळे माझ्यासारख्याला तसेच अनेक कलाकारांना धक्का बसला आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार नेहरी गोबाय आणि सुधीर पटवर्धन यांच्यासह प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचे प्रदर्शन एनजीएमएमध्ये भरवण्याचा कार्यक्रम आधीच एप्रिल-डिसेंबर २०१८ मध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या. मात्र, ज्या जुन्या कमिटीने हा निर्णय घेतला होता त्या कमिटीची मुदत संपल्यानंतर नव्या कमिटीने संस्थेच्या नव्या धोरणानुसार बर्वे, नेहरी आणि पटवर्धन यांच्यापैकी केवळ बर्वेंच्याच चित्रांचे प्रदर्शन करण्याचे निश्चित केले.