बारावीची परीक्षा आजपासून ; मंडळाचे आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका असून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात वेळेआधी अर्धा तास उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य मंडळाने केले.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वर्षी पहिल्यांदाच सरल प्रणालीद्वारे कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन नोंदणी अर्ज भरण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्रे देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ६ हजारांनी वाढली आहे, तर १३५ परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत.

प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हायरल होण्यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाकडून २५२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाइल बंदी आहे. पर्यवेक्षकांनी केंद्रसंचालकांकडे मोबाइल जमा करायचे आहेत. तसेच, परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी आणि परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘परीक्षेसाठी यंत्रणा पूर्ण सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना कोणतीही अडचण आल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी हेल्पलाइनद्वारे संपर्क साधावा,’ असे डॉ. काळे यांनी सांगितले.

आकडय़ांच्या भाषेत..

एकूण विद्यार्थी – १४ लाख ९१ हजार ३०६

परीक्षा केंद्रे – २ हजार ९५७

परीक्षार्थी विद्यार्थी – ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी

परीक्षार्थी विद्यार्थिनी – ६ लाख ४८ हजार, १५१

शाखानिहाय – विज्ञान (५ लाख ६९ हजार ४७६), कला (४ लाख ८२ हजार ३७२),  वाणिज्य (३ लाख ८१ हजार ४४६), व्यावसायिक अभ्यासक्रम (५८ हजार १२)

प्रश्नपत्रिका फुटणे यंदा तरी रोखणार का?

प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार होत असल्याने गेल्यावर्षी मंडळाने लाखबंद (सील) पाकिटांचा उपाय शोधला होता. पर्यवेक्षकांना २५ विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नपत्रिकांचे लाखबंद (सील) असलेले पाकीट देऊन परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन मगच ते पाकीट उघडण्यात आले. मात्र, त्यानंतरही प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांत आल्याच होत्या. त्यामुळे यंदा राज्य मंडळ प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यासाठी कोणती काटेकोर कार्यपद्धती अवलंबणार हा प्रश्न आहे.

हेल्पलाइन क्रमांक

पुणे – ७०३८७५२९७२

नागपूर – (०७१२) ५६५४०३, २५५३४०१

औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८, २३३४२८४

मुंबई – (०२२) २७८८१९७५, २७८९३७५६

कोल्हापूर – (०२३१) २६९६१०१, ०२, ०३

अमरावती – (०७२१) २६६२६०८

नाशिक – (०२५३) २५९२१४३

लातूर – (०२३८२) २५१७३३

कोकण – (०२३५२) २२८४८०

राज्य मंडळ – (०२०) २५७०५२७१, २५७०५२७२

एका विद्यर्थिनीची परीक्षा आयपॅडवर

मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निष्का नरेश हसनगडी या विद्यार्थिनीला विशेष बाब म्हणून आयपॅडवर परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. अध्ययन असक्षमतेमुळे तिच्या डॉक्टरांकडून ही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.