गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री पुण्यात पुन्हा एकदा मोठी आग लागण्याची घटना घडली आहे. पुणे-सासवड रोडवरील वडकी गावातील तेल आणि तुपाच्या गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पुणे सासवड रोडवरील वडकी गावात तेल आणि तुपाचे गोदाम आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे बंब आणि जवान काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन विभागाच्या पाच टॅकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.