पुणे : लोकमान्य टिळकांचे राजकारण, गणिताभ्यास, लेखन, अर्थविचार, पत्रकारिता अशा विविध पैलूंचा वेध घेणाऱ्या ‘एकमेव लोकमान्य’ या लोकसत्ताने तयार केलेल्या विशेषांकाला राज्यभरातील वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या संग्राह्य़ अंकाच्या आता काहीच प्रती शिल्लक असल्याने वाचकांना आपली प्रत मिळविण्यासाठी त्वरा करावी लागणार आहे. अॅमेझॉन या ऑनलाइन विक्रीस्थळावरही हा अंक उपलब्ध आहे.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षांनिमित्त ‘एकमेव लोकमान्य’ या विशेषांकाचे गेल्या आठवडय़ात ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. लोकमान्यांच्या कार्यकर्तृत्वाचा धांडोळा या विशेषांकात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेखकांनी घेतला आहे. टिळकांच्या विचारांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पगडा गेल्या शंभर वर्षांत जनमनावर कायम आहे. प्रत्येक मराठी माणसाला लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अभिमान असतोच. त्यांच्या जीवनातील अनेक घटना, प्रसंगांचा, त्यांनी केलेल्या कामाचा विविध अंगांनी घेतलेला वेध एकत्रितरीत्या वाचकांच्या हाती देण्याचा प्रयत्न या विशेषांकात करण्यात आला आहे. लोकमान्यांना आजच्या संदर्भात समजून घेण्यासाठी हा विशेषांक अतिशय महत्त्वाचा आहे.
अॅमेझॉनवरही उपलब्ध..
महाराष्ट्रातील तसेच देशातील मराठी जनांना हा विशेषांक मिळण्यासाठी ‘अॅमेझॉन’ या ऑनलाइन विक्री यंत्रणेमार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे हा अंक घरपोच मिळू शकेल.