शहरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या बहुतांश भागांत नवरात्रीमध्ये पुढील पाच ते सहा दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसधारा कायम राहणार आहेत. प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये २३ ऑक्टोबपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रातून गेल्यामुळे गेल्या आठवडय़ात राज्याच्या विविध भागांत पावसाने थैमान घातले. हा पट्टा पुढे ओमानच्या दिशेने गेल्याने आता पावसाचा जोर कमी झाला असला, तरी स्थानिक स्थिती आणि परतीच्या पावसाच्या वातावरणामुळे राज्याच्या विविध भागांत पुढील पाच ते सहा दिवस मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, त्याच्या प्रवासाची दिशा, तीव्रता यावरून त्याचा राज्यावरील परिणाम ठरू शकणार असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून दुपापर्यंत निरभ्र आकाश राहून ऊन पडत असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होत आहे.

घाटक्षेत्रात मुसळधारांचा इशारा

पुणे शहर आणि परिसरामध्ये १९ आणि २० ऑक्टोबरला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. २१ ऑक्टोबरला मध्यम स्वरूपाचा, तर त्यानंतर दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस शहरात होण्याचा अंदाज आहे. या दरम्यान २० आणि २१ ऑक्टोबरला जिल्ह्यतील घाटक्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.