लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हा सुरक्षित उपाय असून त्याशिवाय अर्भकांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मातेने स्तनपान देणे, लहान मुलांच्या संपर्कात धूम्रपान टाळणे, तसेच मुलांना पोषक आहारासह मोकळ्या हवेत खेळण्याची संधी देणे, याद्वारेही बालकांना होणारा न्यूमोनिया टाळण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मत जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
३ महिने ते ५ वर्षांपर्यंतची लहान मुले व ६५ वर्षांच्या वरच्या व्यक्तींनाही न्यूमोनिया होऊ शकतो. पूर्वी लहान मुलांमध्ये हगवण (डायरिया) अधिक प्रमाणात दिसायचा, परंतु गेली दहा वर्षे श्वसनाचे विकार अधिक आढळतात. त्यात बालदम्याचे प्रमाण १५ टक्के असून रोज दवाखान्यात दाखल होणाऱ्या २५ मुलांपैकी २ ते ३ मुलांना चाचणीत न्यूमोनियाची सुरूवात झालेली आढळून येते. दररोज १ ते २ बालकांना गंभीर स्वरुपाचा न्यूमोनिया बघायला मिळतो, असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी नोंदवले. ते म्हणाले,‘बाळांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत स्तनपान दिले गेल्यास न्यूमोनियापासून संरक्षण मिळण्यासाठी फायदा होतो. लहान मुलांच्या संपर्कात धूम्रपान अजिबात करु नये. ‘पॅसिव्ह स्मोकिंग’मुळे बालकांच्या फुफ्फुसांची वाढ खुटते व न्यूमोनियाचा धोका वाढतो. गरोदरपणी स्त्रीने धूम्रपान केल्यासही बाळाच्या फुफ्फुसाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. हवेच्या प्रदूषणाचाही विपरीत परिणाम सतत होत असतो. गोवर आणि कांजिण्यांसारख्या काही विषाणूंमुळेही न्यूमोनिया होऊ शकतो, परंतु लसींद्वारे तो टाळता येईल. बालकांनी समतोल आहार घेणे, मैदानात मोकळ्या हवेत फिरणे, भरपूर खेळणे देखील आवश्यक आहे.’
मायकोप्लाझमा नावाच्या एका जंतूमुळेही शालेय मुलांना न्यूमोनिया होऊ शकतो. त्यावर अद्याप लस नाही, परंतु वेळेत निदान झाल्यास इलाज चांगला होऊ शकतो, असेही डॉ. आगरखेडकर यांनी सांगितले.
‘इंडियन अॅकॅडमी ऑफ पीडिअॅट्रिक्स’चे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे म्हणाले,‘ज्या देशांमध्ये पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण दर हजारी ५० हून अधिक आहे अशा देशांमध्ये बालकांच्या लसीकरणात ‘न्यूमोकोक्कल काँज्युगेट व्हॅक्सिन’ या न्यूमोनिया प्रतिबंधक लशीचा समावेश करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. भारतात बालमृत्यूदर दर हजारी ५२.७ इतका आहे.’
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2015 रोजी प्रकाशित
न्यूमोनिया टाळण्यासाठी लसीकरण व बालकांची काळजीही महत्त्वाची
दररोज १ ते २ बालकांना गंभीर स्वरुपाचा न्यूमोनिया बघायला मिळतो, असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी नोंदवले.
Written by दिवाकर भावे

First published on: 12-11-2015 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immunization is essential to avoid pneumonia