खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीचा होणारा विवाह शिरवळ पोलिसांनी रोखला. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवकाशी होणार होते. शिरवळ जवळील एका गावात नातेवाईकांच्या घरासमोर करण्याचे ठरविले होते. संबंधित ठिकाणी लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली होती.
संबंधित लग्न समारंभातील नियोजित वधू ही अल्पवयीन आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या पथकाला लग्नसमारंभाच्या ठिकाणी जाण्यास सांगितले.
वधू – वरावर अक्षता पडण्याची वेळ जवळ आली असताना शिरवळ पोलीस मंडपात दाखल झाले. संबंधित वधूची चौकशी करीत वयाचा पुरावा पाहिला. यावेळी संबंधित वधू ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, शिरवळ पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर विवाह समारंभ हा युवतीचे वय कायद्याप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे नातेवाईकांनी कबूल केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 6:18 pm