करोनाने अवघ्या जगात थैमान घातले असून कित्येकांचे जीव या करोना व्हायरस ने घेतला आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच करोनावर १०५ वर्षांच्या आजींनी मात केली असून त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. शांताबाई गणपत हुलावळे (वय – १०५) असे या आजीचे नाव आहे. ज्यांनी करोना सारख्या भयंकर आजाराला हरवलं आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील १०५ वर्षीय आजी शांताबाई गणपत हुलावळे यांच्या कुटुंबातील चार जणांना करोना विषाणूने गाठलं. त्यात आजींना ही करोनाची लक्षण असल्याने तपासणी करण्यात आली. त्यांची करोना चाचणी पॉजिटिव्ह आल्याने त्यांच्यावर वाकडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. सहा रेमडिसिव्हरची इंजेक्शन देण्यात आली. अवघ्या काही दिवसातच आजींनी उपचाराला प्रतिसाद दिला. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा आजींचे कौतुक करत अभिनंदन केले. आज आजी ठणठणीत बऱ्या असून त्यांच्या नातवांशी गप्पा गोष्टी करत असतात.

शांताबाई यांचे नातू शायमराव हुलावळे म्हणाले की, आजींची स्मरणशक्ती चांगली असून आहार उत्तम घेत असतात. त्यामुळे आजींची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. आजही आजी आरोग्यदायी आहार घेतात. त्यामुळेच आजींनी करोनावर मात केल्याचं ते सांगतात. आजींना कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करायला खूप आवडतात. त्यांच्या काळात जे घडलं ते आजही त्या सांगत असतात.