पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतंच राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्याला महिना उलटत नाही की, राष्ट्रवादी च्या आणखी एका विद्यमान नगरसेवकाचे निधन झाले आहे. जावेद शेख (वय-५०) असे निधन झालेल्या नगर सेवकाचे नाव आहे. हे दोन सच्चे कार्यकर्ते कायमचे निघून गेल्याने राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दुःखद प्रतिक्रिया दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे मोठे नुकसान झाले असून एकाच महिन्यात दोन विद्यमान नगरसेवकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. ४ जुलै ला दत्ता साने यांचे निधन झाले. करोना बाधित जावेद शेख यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते असे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. काल त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती. ते आकुर्डी परिसरातील विद्यमान नगरसेवक होते. त्यांनी तीन वेळेस नगरसेवक पद भूषविले आहे. जावेद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २००७ बिनविरोध, २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत ते नगरसेवक पदावर निवडून आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2020 7:04 pm