गर्भाशय प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच एका महिलेची प्रसूती झाल्याची ऐतिहासिक घटना गुरुवारी पहाटे पुण्यात घडली. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला. डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने गॅलक्सी केअर रुग्णालयात ही ऐतिहासिक प्रसूती केली. पहाटे १२ वाजून १२ मिनिटांनी सिझेरियन प्रसुती झाली. बाळाचे वजन १४५० ग्रॅम आहे. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात हा इतिहास घडला आहे.

दि. १८ मे २०१७ रोजी पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयातील १७ डॉक्टरांच्या पथकाने भारतातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण केले होते. गुजरातमधील वडोदरा येथील महिलेला तिच्या ५२ वर्षी आईने गर्भाशय दान केले होते. गेल्या ७ महिन्यांपासून या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते.

गर्भवती महिलेचा रक्तदाब वाढल्याने महिलेची सिझेरियन करुन प्रसूती करावी लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जन्म घेणारे हे देशातील पहिले बाळ ठरले आहे.