३६० जागांसाठी परीक्षा, ऑनलाइन अर्जासाठी ४ जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रसिद्ध केलेल्या पदसंख्येत वाढ केली आहे. आता ही परीक्षा ३६० जागांसाठी होणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

एमपीएससीकडून १७ फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्य़ाच्या ठिकाणी गट अ आणि गट ब पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी एमपीएससीने ३४२ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सुधारित जाहिरातीत ३३९ जागांसाठी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा त्यात बदल करून परीक्षेसाठीच्या पदसंख्येत वाढ करण्यात आली. आता ३६० पदांसाठी परीक्षा घेतली जाईल.

एमपीएससीच्या सुधारित जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी पदासाठी ४० जागा, पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदासाठी ३१ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा पदासाठी १६ जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २१ जागा, तहसीलदार पदाच्या ७७ जागा, उपशिक्षणाधिकारी अथवा महाराष्ट्र शिक्षण सेवा पदाच्या २५ जागा, कक्ष अधिकारी १६ जागा, सहायक गट विकास ११ जागा, नायब तहसीलदार ११३ जागा या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. एकूण ३६० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी, तर मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात येणार आहे, असे एमपीएससीचे उपसचिव सुनील अवताडे यांनी स्पष्ट केले.