पुणे : शहरात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले असून वेगवेगळ्या घटनांमध्ये ऑनलाइन पद्धतीने तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भवानी पेठ भागातील रहिवासी उमेश गज्जल यांना गेल्या वर्षी कर्ज देण्याचे आमिष अज्ञाताने दाखविले होते. त्यानंतर गज्जल यांच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली. चोरटय़ांनी त्यांच्या खात्यातील १६ हजार रुपयांची रोकड लांबविली. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश बेंद्रे तपास करत आहेत.

समर्थ पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अरफात मलीक (वय ३०, रा. नाना पेठ) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. मलीक यांच्या मोबाइलवर तीन महिन्यांपूर्वी अज्ञाताने संपर्क साधला होता. त्याने मलीक यांच्याकडे बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली होती. क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत करायची आहे, अशी  बतावणी करुन त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

सिंहगड रस्ता भागातील एका व्यावसायिकाला ऑनलाइन पद्धतीने गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभिलाष रोडे (वय २७) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोडे यांची इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे. सुट्टे भाग खरेदी-विक्री संदर्भात त्यांनी अमेरिकेतील एका कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानंतर अज्ञाताने अमेरिकेतील कंपनीच्या इ-मेलचा गैरवापर केला आणि रोडे यांना ४५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. ऑनलाइन पद्धतीने रोडे यांनी ही रक्कम जमा केली. दरम्यान, कंपनीकडे याबाबत रोडे यांनी विचारणा केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत.

एका विमान कंपनीत नोकरीच्या आमिषाने गुजरातमधील तरुणाची १ लाख २३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमिषकुमार नवलाखा (वय २७,रा. सोनगड, जि.तापी, गुजरात) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवे धावडे भागातील एका व्यावसायिकाची ऑनलाइन फसवणूक केल्या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत अनभुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञाताने अनभुले यांना कमी दरात कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखविले होते. अनभुले यांनी ऑनलाईन पद्धतीने अज्ञाताच्या खात्यात १ लाख ३ हजार रुपये जमा केले होते.

ऑनलाइन कुर्ता खरेदीत तरुणाची फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने एका संकेतस्थळावरून कुर्ता खरेदी करणाऱ्या धायरीतील एका तरुणाची १५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजिंक्य पेनुरकर (वय २२,रा. धायरी) याने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी अजिंक्यने ऑनलाइन कुर्ता खरेदीचा व्यवहार केला होता. त्याला घरपोच कुर्ता मिळाला नाही. त्यामुळे त्याने संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर अजिंक्यच्या बँक खात्याची माहिती अज्ञाताने चोरली. त्याच्या खात्यातून १५ हजार रुपये काढून घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील तपास करत आहेत.