अभियंता गायक संदीप रानडे निर्मित अ‍ॅप्लिकेशन

पुणे : गायकाला रियाजासाठी सहाय्यक ठरणारे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विविध वाद्यांची संगीतसाथ करणारे ‘नादसाधना’ अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. संदीप रानडे यांनी या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली असून, अ‍ॅपलकडून पुरस्कार मिळालेले नादसाधना हे केवळ दुसरे भारतीय अ‍ॅप्लिकेशन तर भारतीय संगीतासाठीचे पहिलेच अ‍ॅप्लिकेशन ठरले आहे.

मुळचे अभियंता असलेले संदीप रानडे गायक आणि संगीतकार आहेत. अमेरिकेत गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांमध्ये त्यांनी जवळपास दहा-बारा वर्षे काम केले आहे. संगीताला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रानडे यांनी नादसाधना हे अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅपलच्या प्रणालीमध्ये विकसित केले आहे. रानडे यांनी काही काळ संगीतमरतड पं. जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे. जगभरातील लाखो अ‍ॅप्लिकेशनमधून इनोव्हेशन विभागात नादसाधना अ‍ॅप्लिकेशनची अ‍ॅपलकडून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  नादसाधना हे केवळ दुसरेच भारतीय अ‍ॅप्लिकेशन आहे.

अ‍ॅपलचा पुरस्कार सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातील ऑस्करच्या तोडीचा असल्याने अतिशय आनंद झाल्याची भावना व्यक्त करून संदीप रानडे यांनी अ‍ॅप्लिकेशनविषयी माहिती दिली. ‘नादसाधना अ‍ॅप्लिकेशन रियाजासाठी वापरता येते. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तानपुरा, स्वरमंडल, तबला आदी दहा वाद्यांची गाण्याला साथ करता येते, स्टुडिओच्या दर्जाचे रेकॉर्डिग करण्याची सुविधाही अ‍ॅप्लिकेशनमध्ये आहे. हिंदुस्थानी, उपशास्त्रीय, सुगम, कर्नाटक, पाश्चात्त्य, फ्युजन अशा विविध प्रकारच्या संगीतासाठीच्या सुविधा या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आहेत. संगीताचा, कलाकारांच्या गरजांचा विचार करून अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. गेल्यावर्षी याच अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून करोनाच्या जनजागृतीसाठी ‘ना करो’ ही बंदिश तयार केली होती,’ असे रानडे यांनी सांगितले. हे अ‍ॅप्लिकेशन आयओएसवरून विनामूल्य डाउनलोड करून वापरता येईल. नवोदित कलावंतांसाठी हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

दिग्गजांकडून कौतुक

पं. जसराज, ऑस्करप्राप्त संगीतकार ए. आर. रेहमान, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर, शुभा मुद्गल, आरती अंकलीकर-टिकेकर, शंकर महादेवन, एस. पी. बालसुब्रमण्यम अशा दिग्गजांनी या अ‍ॅप्लिकेशनचे कौतुक केल्याचे रानडे यांनी नमूद केले.