24 September 2020

News Flash

बेशिस्त वाहनचालक पळवताहेत पोलिसांचे ‘जॅमर’

एकीकडे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत असताना पोलिसांच्या कारवाईला न जुमानण्याची वृत्ती बळावत आहे

एकीकडे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत असताना पोलिसांच्या कारवाईला न जुमानण्याची वृत्ती बळावत आहे. बेशिस्त वाहनचालकोंनी चक्क पोलिसांचे जॅमर पळविण्यास सुरवात केली आहे. काही महाभागांनी रितसर जाणते-अजाणतेपणे स्वत:वर चोरीचे गुन्हे दाखल करून घेतले आहेत. वर्षभरात शहरात जॅमर चोरीच्या २३ घटना घडल्या आहेत.
शहरात पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे. मध्यवस्तीत वाहने पार्क करणे जिकिरीचे आहे. प्रमुख रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्या वाहनचालकांवर रितसर जॅमर लावण्याची कारवाई करण्यात येते. मात्र वाहतूक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता काही वाहनचालक जॅमर तोडून पसार होतात. कोही वाहनचालकांनी तर वाहतूक पोलिसांचे जॅमर पळवून नेले आहे. आपण जॅमर तोडून नेतो म्हणजे गुन्हा करतो याची जाणीव अनेकांना नसते. पोलिसांनी अशा वाहनचालकांविरुद्ध चोरीचे गुन्हे (भारतीय दंड विधान ३७९) दाखल केले आहेत.
याविषयी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड म्हणाले, रस्त्यावर बेशिस्त रीत्या लावण्यात आलेल्या वाहनांना जॅमर लावला जातो. जॅमर कारवाई झुगारून देण्याची वृत्ती वाढत आहे. वर्षभरात २३ वाहनचालकांविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. जॅमर तोडणाऱ्यांनी आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल याचे भान राखणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पारपत्र देखील मिळत नाही. अवघ्या शंभर रुपयांच्या दंडासाठी गुन्हा करण्याची मानसिकता योग्य नव्हे हे वाहनचालकांनी ध्यानात घ्यायला हवे.
दुचाकी वाहनांना लावण्यात येणाऱ्या जॅमरची किंमत साधारणपणे ७०० रुपये आहे. तर लक्झरी बस आणि मोटारीवर कारवाईसाठी वापरल्या जाणाऱ्या जॅमरची किंमत तीन हजार रुपये एवढी आहे. बऱ्याचदा तोडलेले जॅमर इतरत्र फेकून वाहनचालक पसार होतात. वाहनचालकांनी नियमांचे पालन केले तर अशाप्रकारचे गुन्हे किंवा चुका टाळता येतील. मोठे जॅमर तोडणे अवघड असते, असेही पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.
पोलिसांशी हुज्जत
पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. २०१४ मध्ये हुज्जत घालण्याचे अकरा गुन्हे दाखल झाले होते. तर यंदाच्या वर्षी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे. १० डिसेंबपर्यंत या स्वरूपाचे २२ गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनचालक नियमभंग करतात. पोलिसांनी कारवाई केल्यास वाहनचालक त्यांच्या अंगावर धावून जातात. पोलीस हे सरकारी कर्मचारी आहेत याचे भानही अनेकांना नसते, याकडेही पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी लक्ष वेधले.
चुकीला माफी नाही
जॅमरचोरी असो किंवा पोलिसांच्या अंगावर धावून जाणे असो, एकदा कागदपत्र रंगली की रितसर गुन्हा दाखल होतो. अशा गुन्ह्य़ांमध्ये अटक होऊन न्यायालयात जामीन मिळवावा लागतो. त्यापेक्षा गुन्ह्य़ाचा शिक्का बसल्यानंतर वैयक्तिक जीवनामध्ये भोगवी लागणारी शिक्षा अधिक जिव्हारी लागते. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जाते. या पडताळणीचे प्रमाणपत्र पोलिसांकडून दिले जाते. त्यामुळे गुन्हा दाखल असेल, तर हे प्रमाणपत्र मिळण्यास अडथळे येतात हे ध्यानात घेऊन नागरिकांनी वर्तन केले पाहिजे, अशी अपेक्षाही सारंग आवाड यांनी बोलून दाखविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 3:20 am

Web Title: indiscipline police jammers driving
Next Stories
1 पुण्याच्या पर्यायी रेल्वे टर्मिनलची गाडी यार्डातच!
2 खरा आनंद शास्त्रीय संगीतामध्येच – बासरीवादक प्रवीण गोडखिंडी
3 लक्ष्मी रस्त्यावर गणेश मंडळाच्या मंडपाला परवानगी देण्यास न्यायालयाचा नकार
Just Now!
X