शिक्षण अधिक रंजक करण्यासाठी शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहणाऱ्या राज्यातील शिक्षकांची आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार असून अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (आयआयएम) सहकार्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एमएससीईआरटी) हा उपक्रम राबवणार आहे.
राज्यातील विविध भागांमधील शिक्षक आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शिक्षण अधिक रंजक करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांनी केलेले प्रयोग, उपक्रम हे सर्वासमोर येत नाहीत. मात्र, आता या सगळ्या शिक्षकांची माहिती त्यांनी राबवलेले उपक्रम, त्याचे परिणाम, ते कसे राबवले, कोणत्या परिस्थितीमध्ये ते राबवता येणे शक्य आहे, अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. आआयएम अहमदाबाद आणि एससीईआरटी मिळून हा उपक्रम राबवत आहेत. यापूर्वी गुजरातमधील शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमांचे संकलन करून ते आयआयएम अहमदाबादने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये चालणाऱ्या प्रयोगशील शिक्षणाची माहिती उपलब्ध होणार आहे. http://www.teachersastransformers.org या संकेतस्थळावर शिक्षकांची आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती प्रसिद्ध होणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ाच्या किंवा विभागस्तरावर शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन उपक्रमांच्या माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या (डाएट) माध्यमातून या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. आतापर्यंत राज्यात उस्मानाबाद आणि जवाहर या ठिकाणी असलेल्या डाएटमध्ये या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. याबाबत उस्मानाबाद येथील डाएटच्या प्राचार्य डॉ. कमालादेवी आवटे यांनी सांगितले, ‘‘उस्मानाबाद येथील कार्यशाळेला शिक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांच्या सवयी बदलणे, व्यक्तिमत्त्व विकास, हस्ताक्षर सुधारणे, कठीण विषय रंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवणे, संवाद कौशल्ये सुधारणे अशा अनेक गोष्टींसाठी शिक्षकांनी खूप छान उपक्रम राबवले आहेत. आम्हाला जवळपास चारशे उपक्रम या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळाले.’’

‘‘शिक्षकांचे उपक्रम सर्वासमोर यावेत. इतर शाळांनाही ते कळावेत, ते राबवता येऊ शकतील का याबाबत चाचपणी करता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. याबाबत आयआयएम बरोबर बोलणी सुरू आहेत. सध्या दोन जिल्ह्य़ांमध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्य़ांमध्ये पुढील कार्यशाळा घेण्याचा मानस आहे.’’
एन. के. जरग, संचालक, एमएससीईआरटी