रेल्वेतून उतरून स्थानकाच्या बाहेर पडत असताना कुणीतरी उगाचच धक्का मारून भांडण काढतो.. काही क्षणात त्याचे एक-दोन साथीदारही तिथे येतात व दमदाटी करतात.. आपापसात किरकोळ भांडणे सुरू असतील म्हणून इतर नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, त्यातील एकजण अचानक चाकू किंवा चॉपर काढतो व त्याचा धाक दाखवून संबंधित प्रवाशाकडील रक्कम किंवा किमती वस्तू काढून घेतली जाते..
मागील काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात व स्थानकालगतच्या परिसरामध्ये केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी दोन महाविद्यालय तरुणांवरही असाच प्रसंग गुदरला. पुणे स्थानकाला अशा हत्यारबंद लुटारूंच्या विळख्यातून सोडविण्यासाठी पोलीस व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
केडगाव येथून श्रेयस दीपक शहा व त्याचा चुलत भाऊ लौकिक हे दोघे महाविद्यालयीन तरूण बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पुणे स्थानकावर उतरले. स्थानकातील पार्सल कार्यालयाच्या पुलापासून पुढे स्थानकातून बाहेर जात असताना एकाने श्रेयसला धक्का मारला व त्यावरून उगाचच भांडण सुरू केले. धक्का मारणाऱ्याचे दोन साथीदारही तिथे होते. त्यांनी श्रेयसला शिवीगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने चाकू काढून श्रेयसला धमकावले, तर एकाने त्याला वर उचलले. त्यानंतर त्याच्या खिशातील सात हजार रुपये असलेले पाकीट काढून लुटारू पळून गेले. प्रसंगावधान राखून दोघेही मोठय़ाने ओरडल्याने इतर प्रवाशांनी एका चोरटय़ाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी संध्याकाळपर्यंत दुसऱ्या चोरटय़ाचाही माग काढला.
श्रेयसच्या प्रकरणामध्ये चोर सापडले असले, तरी अशा अनेक घटनांमधील चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांकडून छोटी- मोठी रक्कम काढून घेतली जाते. प्रवाशाला पुढील गाडी पकडायची असल्याने किंवा तातडीने कुठेतरी पोहोचायचे असल्याने याबाबत काहीजण पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळत असल्याने लुटमारीच्या बहुतांश तक्रारी दाखल होत नाहीत. मात्र, अशा लुटमारीला अनेक प्रवाशांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन व पोलिसांनी ही बाबा गांभीर्याने घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

‘‘रेल्वे स्थानकाच्या आवारात दिवसाढवळ्या हत्यारबंद चोरटे हिंडत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार रेल्वेच्या आवारात वाढले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. रेल्वे पोलिसांबरोबरच रेल्वे सुरक्षा दलानेही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’
– हर्षां शहा,
रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा