थेरगाव-रावेत परिसरात पवना नदीच्या पात्रात मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर बुधवारी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याने मासे मृत पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

शहरात पवना नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून मृत मासे आढळून येत आहेत. मंगळवारी तसाच प्रकार झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, पर्यावरण आणि पाणीपुरवठा विभागाने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवले. बुधवारी नदीतील पाण्याची पाहणी करण्यासाठी पथक थेरगावात दाखल झाले. त्यांनी बोटीत बसून नदीतील पाण्याची तसेच मृत मासे आढळून आलेल्या जागेची पाहणी केली. तेव्हा त्यांनाही मोठय़ा प्रमाणात मृत मासे दिसून आले. हे मासे आणि दूषित पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.