कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांच्या सद्य:स्थितीची माहिती घेण्यासाठी िपपरी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी भल्या सकाळीच पाहणी दौरा सुरू केला. काही ठिकाणी त्यांना समाधानकारक चित्र दिसले तर काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य व राडारोडा आढळून आला. नालेसफाईच्या नावाखाली कामचुकारपणा आणि केवळ बिले काढण्याचे ‘उद्योग’ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.

महापालिका आयुक्त वाघमारे, सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सकाळी सातपासून ‘ई’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील नाल्यांची पाहणी केली. निगडी गावठाण, त्रिवेणीनगर, जाधववाडी भागातील जवळपास दहा नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. या वेळी मनसेचे नगरसेवक राहुल जाधव, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर आदी उपस्थित होते. वरकरणी नाल्यांची सफाई समाधानकारक असल्याचे दिसून येत असले तरी नाल्यांमध्ये राडारोडा तसेच घाणीचे साम्राज्य होते. तर, काही ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. असे चित्र पाहून आयुक्त संतापले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना बोलावून घ्या आणि त्यांच्याकडून तातडीने नाल्यांची सफाई करून घ्या, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामचुकार व केवळ बिले काढण्याचे ‘उद्योग’ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असेही त्यांनी स्पष्ट केले.