पंचतारांकित हॉटेलमध्येच संस्थात्मक विलगीकरण

पुणे : टाळेबंदी काळात परदेशात अडकलेल्या नागरिकांना मोठा गाजावाजा करत भारतात परत आणण्यात येत आहे. मात्र, पुण्यात परतलेल्या प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्येच संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाइन) केले जात असल्यामुळे या प्रवाशांना विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांचा भुर्दंड पडणार आहे.

परदेशी प्रवास करून पुण्यात परतलेल्या नागरिकांची विमानतळावरच प्राथमिक तपासणी करून त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या खासगी हॉटेलमधील खोल्या आरक्षित केल्या आहेत. मात्र, तेथील राहणे, न्याहारी, जेवणाचा खर्च नागरिकांनाच करावा लागत आहे. या हॉटेलांमधील खोल्यांचे प्रतिदिन भाडे तीन हजार ते पाच हजारांपर्यंत आहे. त्यामुळे ऐन मंदीकाळात हॉटेलचालकांना ग्राहक मिळाले आहेत. काही हॉटेलांच्या व्यवस्थापकांनी १४ दिवसांचे खास विलगीकरण पॅकेज जाहीर केले आहे. ५ मेपासून परदेशात अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानांनी परत आणले जात आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था ते वास्तव्यास असणाऱ्या जिल्ह्य़ाच्या मुख्य शहरातील हॉटेलमध्ये करायची आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लंडन येथून परतलेल्या प्रवाशांची बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. दरम्यान, प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार बालेवाडी येथील हॉटेलमध्ये विलग केले असून प्रतिदिवस खर्च तीन हजार रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. तर, विलग करण्यात आलेल्यांना प्रतिव्यक्ती प्रतिदिवस २८०० रुपये यानुसार १४ दिवसांचे ३९ हजार दोनशे रुपये आकारण्यात येतात, असे संबंधित हॉटेल प्रशासनाने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रशासनाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात सोय केलेल्यांना मात्र, कोणत्याही प्रकारचा खर्च आकारला जात नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रवाशांच्या इच्छेनुसारच हॉटेलमध्ये विलगीकरण

‘टाळेबंदी लागू झाल्यानंतर परदेशातून पुण्यात आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण करताना प्रशासनाच्या विलगीकरण कक्षात जायचे किंवा स्वतंत्र सोय हवी असे दोन्ही पर्याय देण्यात येत आहेत. ज्या प्रवाशांनी हॉटल पर्याय निवडला त्यांना प्रशासनाने निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये विलग केले जात असून तेथील सर्व खर्च संबंधित प्रवाशांनीच करायचा आहे. याबाबतही प्रवाशांना पूर्वकल्पना दिली जाते’, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आणि परदेशातून पुण्यात आलेल्या प्रवाशांना विलग करण्याबाबतचे समन्वय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.