News Flash

आनंदातून अर्थार्जन करणारे वाद्यांचे डॉक्टर!

संवादिनी, ऑर्गन, सतार, बासरी, दिलरुबा, पियानो,व्हायोलिन, संतूर, तबला, गिटार, अॅकॉर्डियन, तंबोरा अशा वेगवेगळ्या वाद्यांची केवळ छंद म्हणून दुरुस्ती करणाऱ्या

एखादी कला अंगामध्ये असावी या उद्देशातून वाद्य वाजविता येणे हे नैपुण्य मानले जाते. हे नैपुण्य संपादन करण्यासाठी अनेक जण कोणते ना कोणते वाद्यवादन करण्याचे शिक्षण घेतात. पण, वाद्यवादन करणाऱ्या प्रत्येकालाच त्या वाद्याची दुरुस्ती करता येत नाही. अशा वेगवेगळ्या वाद्यांची दुरुस्ती करणारे कारागीर पुरुषोत्तम जोग हे काम नोकरी सोडून गेल्या दीड दशकांपासून आनंदाने करीत आहेत. या कामातून अर्थार्जन किती होते यापेक्षाही कलाकाराला वाद्याचे योग्य ‘टय़ूनिंग’ हेच माझ्या कामाचे समाधान, असे म्हणणारे जोग हे खऱ्या अर्थाने वाद्यांचे डॉक्टरच आहेत.
संवादिनी, ऑर्गन, सतार, बासरी, दिलरुबा, पियानो,व्हायोलिन, संतूर, तबला, गिटार, अॅकॉर्डियन, तंबोरा अशा वेगवेगळ्या वाद्यांची केवळ छंद म्हणून दुरुस्ती करणाऱ्या पुरुषोत्तम जोग यांना या वाद्यांनीच अनेक कलाकारांचा स्नेह मिळवून दिला आहे. स्वरांचे ज्ञान असल्यामुळे ही दुरुस्त केलेली वाद्यं योग्य प्रकारे ‘टय़ून’ झाली आहेत का ते पाहण्यासाठी जोग ही वाद्ये उत्तम प्रकारे वाजवितात. निरपेक्षवृत्तीने करीत असलेल्या संगीत कार्याबद्दल गानवर्धन संस्थेने यंदाच्या वर्षीपासून सुरू केलेला ‘वाद्य कारागीर पुरस्कार’ पुरुषोत्तम जोग यांना जाहीर केला आहे. टिळक स्मारक मंदिर येथे रविवारी (२७ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मूळचे कोकणातील चिपळूणचे असलेले जोग बी. कॉमची पदवी संपादन केल्यानंतर उपजीविकेसाठी पुण्यामध्ये आले. वाद्य शिकण्याची सुप्त इच्छा स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी फरासखान्यासमोर राहणाऱ्या बाबूराव क्षीरसागर यांच्याकडे तबलावादन शिकण्यास प्रारंभ केला. तबलावादनाचे दोन-चार महिने शिक्षण घेतल्यानंतर, तबला दुरुस्तीही शिकवावी, अशी विनंती क्षीरसागर गुरुजींकडे केली. एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशीच वाद्यदुरुस्तीची कथा जोग यांनी उलगडली. तबला दुरुस्तीचे शिक्षण घेत असतानाच तपकीर गल्लीमध्ये राहणारे नानासाहेब घोटणकर यांच्याकडून मला ऑर्गन दुरुस्तीचे प्रशिक्षण मिळाले. मधुकर वृत्तीने शिकण्याची माझी प्रवृत्ती आहे. अविनाश गोडबोले यांनी व्हायोलिन, हेमंत गोडबोले यांनी पियानो आणि अॅकॉर्डियन या वाद्यांच्या दुरुस्तीचे शिक्षण दिले. वेगवेगळ्या स्वरूपाची नोकरी करून फावल्या वेळात मी वाद्य दुरुस्तीचे शिक्षण घेत होतो. यामध्ये माझ्या पत्नीने भक्कम पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. ती स्टेट बँकेमध्ये कामाला असल्यामुळे मला घरामध्ये कोणतेही लक्ष द्यावे लागले नाही. पत्नीनेही मला माझा छंद जोपासण्यासाठी मोकळेपणा दिला, असेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
नोकरी सोडून २००० मध्ये माणिकबाग येथे मी स्वत:चे दुकान सुरू केले. या कलेमुळे वेगवेगळ्या कलाकारांशी स्नेह जुळला. वाद्य दुरुस्ती हे किचकट, संयमाची परीक्षा पाहणारे काम आहे. हल्लीच्या मुलांना फारसे कष्ट न घेता खुर्चीमध्ये बसून भरमसाठ पैसे हवे आहेत. त्यामुळे वाद्य दुरुस्ती शिकण्यासाठी कोणी तरुण पुढे येत नाहीत. हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून फुकट वाद्य दुरुस्ती शिकविण्यासाठी एकदा मी जाहिरात दिली होती. जेमतेम आठ युवक आले. पण, हे शिकल्यानंतर पैसे किती मिळतील, असा त्यांचा प्रश्न होता. ही विद्या शिकविण्याची इच्छा असूनही ज्ञान घेण्यासाठी कोणी येत नाही या वास्तवावर जोग यांनी बोट ठेवले.
जोग यांनी दुरुस्त केलेली वाद्ये
संवादिनी – ९५०
तबला-ढोलक – १०००
गिटार – २००
दिलरुबा – १०
तानुपरे – १००
व्हायोलिन – ५०
पायपेटी – ६
ऑर्गन – ५
अॅकॉर्डियन – ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:20 am

Web Title: instruments doctors enjoy purushottam jog
टॅग : Doctors
Next Stories
1 धाडसाबद्दल पोलीस शिपायाच्या पाठीवर आयुक्तांकडून शाबासकीची थाप
2 जागरूक असेल तरच.. ‘ग्राहक राजा’
3 पुण्यासाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती करा
Just Now!
X