News Flash

स्वारगेट परिसराचा ‘बीओटी’वर एकात्मिक विकास

स्वारगेट परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली असून या संपूर्ण परिसराचा एकात्मिक विकास केला

| August 28, 2014 03:35 am

एसटी आणि पीएमपी डेपो, तसेच बाजार, वाहनतळ, रिक्षातळ, हजारो वाहने आदींमुळे स्वारगेट परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली असून या संपूर्ण परिसराचा एकात्मिक विकास या प्रकल्पातून केला जाणार आहे. मेट्रो, मोनोरेल, एसटी, पीएमपी, रिक्षा यांच्या एकत्रित स्थानकाबरोबरच या भागात वाहनतळ आणि व्यापारी संकुले उभी करण्याची योजना आहे. त्यामुळे वाहतुकीचे सर्व पर्याय पुणेकरांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
स्वारगेट चौकातील गर्दी आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आखणी करण्यात आलेल्या या प्रकल्पाला आवश्यक असलेली जागा देण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. स्वारगेट येथे एसटी तसेच पीएमपीचे डेपो आहेत आणि सातारा, सोलापूर तसेच मुंबईकडून येणाऱ्या वाहनांची व एसटी गाडय़ांची संख्याही येथे मोठी आहे. रिक्षा आणि पीएमपीच्या गाडय़ांचीही वर्दळ येथे सतत असते. यावर उपाय म्हणून संपूर्ण परिसराचा एकात्मिक विकास करण्याचे नियोजन आहे. देशात बंगळुरू येथे अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्यात आला आहे.
स्वारगेट परिसरात महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग, रस्ते विकास मंडळ, पीएमपी, एसटी या सर्वाची मिळून २३ एकर जागा आहे. या सर्व जागेचा वापर करून स्वारगेट परिसराचा विकास करण्याचा प्रकल्प आहे. या भागात असलेल्या एसटी डेपोच्या जागेवर एसटीसाठीचा डेपो आणि वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. पाणीपुरवठा विभागाच्या जागेवर पीएमपीचे मुख्यालय, डेपो आणि पार्किंगची सुविधा असेल. वाहनतळांच्या वेगवेगवळ्या इमारती उड्डाणपुलांनी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. पुढील चाळीस वर्षांचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. मेट्रोच्या स्थानकाचेही नियोजन याच परिसरात करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प रस्ते विकास मंडळाकडून बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर- बीओटी) या तत्त्वावर करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पात व्यापारी संकुलाचीही उभारणी प्रस्तावित असून त्यातून विकसकाला मोबदला मिळेल. प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून जादा एफएसआय मिळावा यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून महापालिकेची जागा मिळण्यासाठी पालिकेची मान्यता मिळणे आवश्यक आहे.

स्वारगेट परिसराच्या एकात्मिक विकासाची योजना
खासगी तत्त्वावर प्रकल्प राबवण्याचे नियोजन
प्रकल्पाचा खर्च सहा हजार कोटी रुपये
मेट्रो, मोनो, एसटी, पीएमपी, रिक्षा आदी सुविधा एकाच ठिकाणी
वाहनतळांसाठी स्वतंत्र इमारती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 3:35 am

Web Title: integrated development of swargate area
Next Stories
1 विजय निश्चित; गहाळ राहू नका – उद्धव ठाकरे
2 नालायकीचे किळसवाणे दर्शन
3 पद्मावती परिसरात स्केटिंग बोर्ड
Just Now!
X