News Flash

‘आयसर’मधील ‘परमब्रह्मा’ महासंगणक पर्यावरणपूरक

केंद्र शासनाच्या ‘नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत आयसरमध्ये महासंगणक बसवण्यात आला आहे.

|| चिन्मय पाटणकर

 

‘इंटरनल वॉटर कूलिंग’ यंत्रणेमुळे संगणकाच्या चीप अंतर्गतच थंड

भारतीय विज्ञान संशोधन शिक्षण संस्थेत (आयसर) कार्यान्वित करण्यात आलेला परम श्रेणीतील ‘परमब्रह्मा’ हा महासंगणक पर्यावरण पूरक असून या महासंगणकासाठी ‘इंटरनल वॉटर कूलिंग’ ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा असलेला हा पहिलाच महासंगणक ठरला आहे. या महासंगणकामुळे अतिशय कठीण अशा गणिती क्रिया झटपट करता येणार असून अनेक महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे.

केंद्र शासनाच्या ‘नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत आयसरमध्ये महासंगणक बसवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थेला भेट देऊन या महासंगणकाची माहिती घेतली होती. ‘सीडॅक’ने हा महासंगणक विकसित केला आहे. पश्चिम भारतातील संस्थेत बसवण्यात आलेला हा पहिलाच महासंगणक आहे. ७९७ टेराफ्लॉप्स इतक्या प्रचंड क्षमतेच्या या महासंगणकाविषयी आयसरचे डॉ. संजीव गलांडे यांनी माहिती दिली.

‘महासंगणक आयसरमध्ये येणे ही मोठी उपलब्धी आहे. या महासंगणकामुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवता येतील. पश्चिम भारतातील हा पहिलाच महासंगणक असल्याने या भागातील संस्थांनाही तो वापरता येईल. त्यामुळे सहयोगी पद्धतीने प्रकल्प राबवता येतील. गणित, रसायनशास्त्र, बिग डेटा अशा विविध क्षेत्रातील संशोधनासाठी हा महासंगणक अतिशय उपयुक्त ठरेल. किचकट गणिती क्रिया हा महासंगणक क्षणार्धात करू शकत असल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे. त्याशिवाय या महासंगणकातील ‘इंटरनल वॉटर कूलिंग’ ही पर्यावरण पूरक यंत्रणा वैशिष्टय़पूर्ण आहे. अशा प्रकारची यंत्रणा असलेला हा पहिलाच महासंगणक आहे,’ अशी माहिती डॉ. गलांडे यांनी दिली.

आणखी तीन संस्थांमध्ये..

परम या श्रेणीतील दोन महासंगणक या पूर्वी आयआयटी खरगपूर आणि बनारस हिंदू विद्यापीठात बसवण्यात आले आहेत. तर येत्या काळात आयआयटी कानपूर, आयआयटी हैदराबाद आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् सायन्स रीसर्च, बेंगळूरु या संस्थांमध्ये महासंगणक बसवण्यात येणार आहे.

सर्वसाधारणपणे संगणकाचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वातानुकूलन यंत्रे बसवावी लागतात. महासंगणकाची यंत्रणा जास्त क्षमतेची असल्याने त्यासाठी जास्त वातानुकूलन यंत्रे लागतात. मात्र, ‘इंटरनल वॉटर कूलिंग’ यंत्रणेमुळे संगणकाच्या चीप अंतर्गतच थंड केल्या जातात. त्यामुळे जास्त वातानुकूलन यंत्रे बसवण्याची गरज नाही. हे तंत्रज्ञान नवे आहे. त्यामुळे ‘परमब्रह्मा’ हा महासंगणक पर्यावरण पूरक करण्यात यश आले आहे.  – डॉ. हेमंत दरबारी, महासंचालक, सी डॅक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 1:29 am

Web Title: internal water cooling cools under the computer chip akp 94
Next Stories
1 ‘सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत राज्यांची भूमिका महत्त्वाची नाही’
2 भारतीयांचे वार्षिक सरासरी १८०० तास मोबाइलवर!
3 कालव्यानजिकच्या अतिक्रमणांना जलसंपदा विभागाच्या नोटिसा
Just Now!
X