एकविरा मंदिराच्या कळस चोरीप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी मंगळवारी मंदिर परिसराला भेट दिली. स्थानिक पोलिसांना या प्रकरणात अद्याप कोणताही सुगावा सापडलेला नाही. त्यामुळे नांगरे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

एकविरा देवीचे मंदिर हे ठाकरे परिवाराचे कुलदैवत आहे. लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस ३ ऑक्टोबरला चोरीला गेला होता. या घटनेला ४० दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटून गेला आहे. मात्र, अद्याप ही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर नांगरे- पाटील यांनी एकविरा मंदिर परिसरात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्थानिक पोलिसांना लवकरात तपासाचा छडा लावावा, अशी सूचना केली.

गेल्या महिन्यात ३ ऑकटोबरला चोरटयांनी एकविरा मंदिरावरील कळस पळवला होता. सकाळी आठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भक्ताला हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेचच मंदिर प्रशासनाला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी चौकशीला सुरवात केली. मात्र, त्यांना अद्याप यश आलेलं नाही.