News Flash

हे फक्त पुण्यातच घडू शकतं !

पुणेकरांना आपल्या शहराबद्दल वाजवीपेक्षा जरा जास्तच अभिमान आहे, असा एक सूर उर्वरित महाराष्ट्रातील लोक लावतात. त्यात थोडी असूया असते. मग आपापल्या परीने ते पुण्याला दूषणे

| March 12, 2013 03:00 am

पुणेकरांना आपल्या शहराबद्दल वाजवीपेक्षा जरा जास्तच अभिमान आहे, असा एक सूर उर्वरित महाराष्ट्रातील लोक लावतात. त्यात थोडी असूया असते. मग आपापल्या परीने ते पुण्याला दूषणे देण्याचा माफक प्रयत्न करतात, पण त्यात काही अर्थ नाही. कोणी म्हणे पुण्यातले लोक आळशी असतात. दुपारी झोपतात. दुकानं दुपारची बंद असतात. असे आरोप करणाऱ्यांना पुणेकरांचा अप्रतिम हेवा वाटत असतो. त्या भरात त्यांच्या हे लक्षात येत नाही, की दिवसभर धावत राहणे याचा अर्थ तुम्ही कामसू आहात असा होत नाही. आता हे मुंबईकर बघा ना. सकाळी सातला घराबाहेर पडतात, बसमध्ये, लोकलच्या डब्यात दीड-दोन तास घालवून कसे बसे ऑफिसला पोहोचतात, अर्धमेल्या अवस्थेत. पुन्हा घरी परतताना तेच हाल. भरीला ट्रॅफिक जॅम्स वगैरे आहेतच. अशा रीतीने आयुष्याचा बराच काळ त्यांची लटकलेली वटवाघळं झालेली असतात. पण त्यांना असं वाटतं की या हालअपेष्टा म्हणजेच काम. पुण्यातल्या लोकांना त्यांच्याविषयी खूप सहानुभूती वाटते. परंतु पुणेकरांची दिनचर्या तशी नाही. जुन्या पेन्शनर पुणेकरांचा तर प्रश्नच नाही. खरंतर तेच भल्या पहाटे उठून पर्वती किंवा वेताळ टेकडी वगैरे चढून उतरून त्यांच्या अड्डय़ावर गप्पा टाकत असतात. त्या गप्पांमध्ये ओबामाने काय करायला हवे इथपासून भाजणीच्या थालीपीठाचे शरीराला होणारे फायदे इथपर्यंत सर्व विषयांचा अंतर्भाव असतो. पण हे चित्र तर कुठेही बघायला मिळतं. शिवाजी पार्कपासून रंकाळ्यापर्यंत. पण आमच्या मन्या परांजपेसारखी लाइफ स्टाईल दुसरीकडे दाखवा. शक्यच नाही.
मन्या परांजपे सकाळी पाच वाजता उठतो. हसऱ्या चेहऱ्यानी. सायकल घेतो आणि रपेट मारायला जातो. चांगले तीस चाळीस किलोमीटर. मग ‘रूपाली’ वर येतो (रूपाली म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ उप्पीट मिळणारे उपाहारगृह). तिथे त्याचा एक ‘क्रॉसवर्ड’ सोडवणारा ग्रुप आहे. वाफाळत्या उप्पीट, इडली, कॉफीबरोबर मनाची मशागत झाली की तो घरी जातो. तयार होऊन ९ वाजता त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. ताजातवाना, उत्साहानी मुसमुसलेला. कारण घर ते ऑफिस हा प्रवास १५ मिनिटांचा. ९ ते १ कामाचा फडशा पडला की घरी जेवायला परत. डबेवाला, थंड जेवण वगैरे तडजोडी नाहीत. तव्यावरची पोळी, ताजा भात या किमान अपेक्षा आहेत त्याच्या. जेवण झालं की मन्या बायकोला सांगतो, ‘प्रिये, मला अनास्थेशिया (भूल) दे’. असे म्हणून तो पलंगावर झोपण्याच्या तयारीत बसता होतो. इकडे त्याची बायको चितळे बंधूंच्या दुकानातून आणलेला शुद्ध तुपातला मोतीचुराचा लाडू घेते आणि एका बाउलमध्ये चार चमचे साजूक तुपात तो लाडू ठेवते. मग मायक्रोवेव्हमध्ये गरम करून हा संपृक्त लाडू मन्याला खायला देते. मन्या हा लाडू खाताच त्याच्यावर जणू अनास्थेशियाचा अंमल होतो आणि तो झोपी जातो. ३ वाजता त्याला जाग येते तेव्हा तो रिचार्ज झालेला असतो. ३ ते ७ पुन्हा कामावर. कामाचा फडशा. की ७ वाजता तो बिलियर्ड्स खेळायला मोकळा. नंतर बायकोबरोबर झाकीर हुसेन ऐकायला नाहीतर नाटक बघायला आवर्जून उपस्थित. इतर शहरातील लोकांनी निंदा व वंदा पण हे फक्त पुण्यातच होऊ शकतं.
आता अनेकदा वऱ्हाडी लोकांच्या आदरातिथ्याच्या भ्रामक कल्पना पुढे करून पुणेकरांवर अनाठायी आरोप केला जातो की, ते माणूसघाणे असतात. पण हे साफ खोटं आहे. याउलट दारी आलेल्या पाहुण्याची ‘त्याच्या योग्यतेनुसार’ उठबस करणं हा पुणेकरांचा स्वभाव आहे. कामाशिवाय उगीच येणाऱ्या आगंतुकाला चहा वगैरे देणे म्हणजे पाहुणचार नव्हे. उलट आपल्या अमूल्य वेळेचा अपव्यय करणाऱ्या प्रवृत्तींना दाराबाहेरच ठेवणे बरे हे धोरण पुणेकर जाणतात. त्यामुळे असा आरोप करणाऱ्यांनी आपल्याबद्दल समोरच्याला काय वाटते हे समजून घ्यावे. अनेकदा पुण्यातल्या हॉटेलात पाटय़ा असतात- ‘कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. राजकारणाविषयी चर्चा चालणार नाहीत.’ हे तर काहीच नाही. आमच्या एका मित्राने घराच्या दारातच मोठा आरसा लावला आहे. त्याला विचारले की बाबा रे, याचे प्रयोजन काय? तेव्हा तो वदला, ‘येणाऱ्या व्यक्तीला एकदा स्वत:चे प्रतिबिंब दाखवावे म्हणजे तो आत्मपरीक्षण करेल की या घरात जायला मी पात्र आहे अथवा नाही. आणि अनुभव असा की बरेच लोक आल्यापावली परततात.’ हे फक्त पुण्यातच होऊ शकतं.
कोल्हापूरकडची राजेशाही मंडळी म्हणतात की, पुणेकर चिक्कू असतात. पण उधळपट्टी न करणं हा चिक्कूपणा कसा होईल? आता हेच पहा ना- समजा आपला पाय मुरगळला तर आपण काय करतो? आपण मलम लावतो. दोन दिवस वाट पाहतो. जर दुखणं थांबलं नाही तर डॉक्टरकडे जातो. मग तो देईल ते औषध आणि करेल ते उपचार. आपल्या मनानी आपण काहीही करत नाही. याचाच अर्थ असा की, मलम हा एक तात्पुरता उपाय अहे. मग असे असताना आपण मलमाची अख्खी बाटली कशाला आणायची? ती वायाच जाणार. आपल्या मनातल्या या प्रश्नाची जाणीव होऊनच पुण्यातल्या एका औषधाच्या दुकानावर बोर्ड झळकला- ‘आमचे येथे सुटे आयोडेक्स मिळेल.’ या दुकानात गेल्यानंतर आपण एक रु पया दिला की दुकानदार झाकण काढून बाटली समोर धरत असे. आपण बोट घालून मलम घ्यायचे. बोट वाकडे करायचे नाही. तसे केल्यास दुकानदार एक रु पया जास्त घेत असे. हे फक्त पुण्यातच होऊ शकतं.
पुणेकर मंडळींबद्दल आणखी एक मत म्हणजे ते विक्षिप्त असतात. हो, असतात. नाही कोण म्हणतंय? पण या विक्षिप्तपणातच संशोधक, काळाच्या पुढे असणारे विचारवंत आणि असामान्य बुद्धीचे नमुने दडलेले असतात. रूढार्थानं ते वेडे असतीलही पण अगदी थोडक्यात ज्यांचं नोबेल हुकलंय असे अनेक चक्रम पुण्यातच भेटतात. आता आमचा काका गोखले असाच झंगड होता. त्यानं विविध प्रयोग केले. पण त्याच्या संशोधनाचं चीज झालं नाही. उदाहरणार्थ त्यानं एका रेकॉर्ड-प्लेयरच्या वायरिंगमध्ये असे फेरफार केले की तबकडी उलटय़ा दिशेनं फिरू लागली. मग त्या तबकडीवर सुई ठेवली की ती उलटी- म्हणजे आतून बाहेरच्या बाजूला प्रवास करू लागली. त्यामुळे त्या रेकॉर्डमधून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. काकानं त्या आवाजांचा अभ्यास केला आणि असा निष्कर्ष काढला की या उरफाटय़ा रेकॉर्ड प्लेयरवर मराठी गाण्याची तबकडी लावली की ती उर्दूत ऐकू येते. हा असा शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी तसंच वातावरण असावं लागतं म्हणून. हे फक्त पुण्यातच होऊ शकतं.
आणि हो, एक लिहायचं राहिलं की, जे पुण्यात होऊ शकतं ते फक्त पुण्यातच होऊ शकतं. कारण ‘आमची इतरत्र कुठेही शाखा नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2013 3:00 am

Web Title: it can happen only in pune
Next Stories
1 अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे तारांगण पुण्यात साकारणार
2 रस्त्यांवरील धोकादायक वाहनांना परिवहन खात्याचीच मान्यता!
3 दिल्ली आयआयटी व पुणे विद्यापीठ यांच्यात होणार सामंजस्य करार
Just Now!
X