आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या आघाडय़ांवर प्रयत्न सुरू केले असून मतदारांवर प्रतिमा ठसवण्यासाठी वेगवेगवळी तंत्र इच्छुकांकडून अवलंबली जात आहेत. एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे समाज माध्यम. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अभियंत्यांना महापालिका निवडणुकीच्या तयारीत सध्या चांगलीच मागणी आहे.

सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत आणि विविध पक्षांतील इच्छुकांपर्यंत सर्वानीच प्रतिमा बांधणीसाठी, असलेली प्रतिमा उजळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना तसेच कर्मचाऱ्यांना पाचारण केले आहे. वैयक्तिक पातळीवर फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये पर्यायाने प्रत्येकाच्या तोंडी नाव राहणे उमेदवारांना गरजेचे आहे.

ही गरज ओळखून इच्छुक उमेदवारांनी ‘फेसबुक पेज’ तयार करण्याचे काम आयटी अभियंत्यांना दिले आहे. त्याच्या जोडीला व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप करून उमेदवारीची माहिती देणारे, त्याने कोणती कामे केली किंवा संधी दिल्यास काय करू हे सांगणारे संदेश तयार करुन ते शेअर केले जात आहेत. खास अ‍ॅप्लिकेशन तयार करून घेण्यासाठीही आयटीतील अभियंत्यांना मागणी आहे.

फेसबुक पेजेस किंवा संदेश सातत्याने तयार करणे, ते आपल्या प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचवणे, संदेशांचा ओघ कायम राखणे, पेज अद्ययावत ठेवणे गरजेचे झाल्यामुळे हे कामही आयटी कंपनीला किंवा अभियंत्यांना दिले जात आहे.

पाच दिवसांचा आठवडा असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राजकीय मंडळींची कामे करून देण्यासाठी खास शनिवार-रविवार राखून ठेवला आहे. ही मंडळी दहा ते पंधरा लाख रुपये एक फेसबुक पेज तयार करण्यासाठी आणि ते चालविण्यासाठी घेत आहेत. तर ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप यांसाठी वेगळी पॅकेजेस आहेत. प्रचाराचा सोपा, प्रभावी मार्ग म्हणून समाज माध्यमांकडे पाहिले जात असल्यामुळे या माध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.