‘ती फुलराणी’तील बदलाच्या पाश्र्वभूमीवर डॉ. जब्बार पटेल यांनी कान टोचले

नाटक हे नाटककाराचे माध्यम आहे, ही बाब दिग्दर्शक आणि कलाकारांनी प्रयोग करण्यापूर्वीच ध्यानात घ्यायला हवी. ‘ती फुलराणी’ नाटकाच्या प्रयोगामध्ये मोडतोड करणे अनैतिक असल्याचे सांगत डॉ. जब्बार पटेल यांनी कान टोचले आहेत.

नाटककाराने शब्दन्शब्द विचारपूर्वक वापरलेला असतो. त्यामुळे नाटककाराच्या संहितेबरहुकूम प्रयोग करणे हे दिग्दर्शकाचे कर्तव्य आहे. संहितेमध्ये बदल किंवा विस्तार करावयाचा असेल, तर नाटककाराशी बोलून आणि त्याची परवानगी घेऊनच केला पाहिजे. एखाद्या प्रसिद्ध नाटककाराची लोकप्रिय कलाकृती घेता, तेव्हा त्या संहितेशी प्रामाणिक राहणे ही जबाबदारी वाढते. पुलं यांच्यासारख्या नाटककाराच्या नावावर प्रेक्षक नाटय़गृहात येत असतो. कॉपीराइट कायद्यानुसार एखाद्या लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांनी त्याच्या नाटकाचे प्रयोग खुले होतात. पण, पुलं आणि सुनीताबाई मनाने मोकळे असल्याने त्यांनी पूर्वीच त्यांच्या नाटकांचे हक्क सर्वासाठी खुले केले आहेत. त्यामुळे कॉपीराइट ही गोष्ट नैतिकता म्हणून पाळली पाहिजे. पुलंचे नाव वापरताना त्यांच्या कलाकृतीमध्ये बदल करायचे असतील, तर मग प्रयोगच करू नका. पण, त्यांच्या संहितेला आणि त्याच्या आशयाला धक्का लागता कामा नये, याची दक्षता ही घेतलीच गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘संहितेमध्ये बदल करू नयेत’

पुलं यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकाच्या मूळ संहितेमध्ये बदल करू नयेत, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. नाटक लिहिताना नाटककाराची प्रतिभा, कल्पकता, कला आणि कसब हे सारे पणाला लागलेले असते. त्यामुळे नाटक करताना मूळ संहितेमध्ये फरक करू नये. तसे झाले तर त्या लेखनातील ताकद गमावली जाण्याची शक्यता असते. ती रसिकांना मान्य होणारी नसते, याकडेही पुरंदरे यांनी लक्ष वेधले.

‘नाटकाची जातकुळी विचारात घ्यावी’

लेखकाने लिहिलेल्या मूळ संहितेत बदल करणे किंवा नाटकात आपल्या पदरची काही वाक्ये टाकणे हे चूक आहे, अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मांडली. लेखकाने नाटक लिहिताना काही ठिकाणी मोजून मापून शब्द वापरून खूप काळजीपूर्वक वाक्ये लिहिलेली असतात. त्यामुळे लेखकाने हेच वाक्य का लिहिले आहे, त्यामागचा त्याचा उद्देश काय आहे? याचा दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारांनी विचार करावा. एखादे नाटक विनोदी किंवा फार्स प्रकारातील असेल तिथे एक वेळ कलाकारांनी पदरची वाक्ये घातली, तर ते क्षम्य आहे पण गंभीर नाटकाबाबत ते कधीही करू नये. नाटकाची ‘जातकुळी’ विचारात घेतली जावी.

‘ती फुलराणी’चे आतापर्यंत दहा प्रयोग झाले असून आजवर झालेल्या कोणत्याही प्रयोगात नाटकाच्या मूळ संहितेत आम्ही कोणताही बदल केलेला नाही. नाटकातील वाक्य तर जाऊ दे पण संहितेतील एखादा शब्दही मागे-पुढे होणार नाही, याची आम्ही कटाक्षाने खबरदारी घेत असतो. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या मूळ संहितेनुसारच ‘ती फुलराणी’चे प्रयोग होत आहेत आणि यापुढेही होत राहतील.

– राजेश देशपांडे, दिग्दर्शक, ‘ती फुलराणी’