जैन विचार हा भारतीय तत्त्वज्ञानाचा आत्मा आहे. हे विचार वारसारूपाने सातत्याने भावी पिढय़ांपर्यंत संक्रमित होत असल्याने जैन समाज हा यशस्वी समाज म्हणून ओळखला जात आहे, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि फोर्स मोटर्सचे अभय फिरोदिया यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’च्या (जितो) पुणे विभागातर्फे आयोजित ‘जितो कनेक्ट २०१६’ या जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी फिरोदिया बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक रसिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल, जितो अपेक्सचे तेजराज गुलेचा, राकेश मेहता, पुणे विभागाचे अध्यक्ष विजय भंडारी, राजेश सांकला, सचिव नरेंद्र छाजेड, अजित सेटिया या वेळी उपस्थित होते.
जगातील प्रत्येक धर्मप्रवर्तकाने सत्यच सांगितले आहे. त्यामुळे जैन धर्म काय आहे हे आजच्या पिढीने समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे सांगून फिरोदिया म्हणाले, सध्या संप्रदायालाच धर्म मानण्याची चुकीची पद्धत रूढ होत आहे. जैन धर्म हा सांप्रदायिक धर्म नाही. हिंदूू धर्म हा भक्तिमार्ग असेल तर, जैन परंपरा हा ज्ञानमार्ग आहे. पहिले र्तीथकर भगवान ऋषभदेव यांनी सांगितलेला ज्ञानमार्ग समाजाने परंपरेने टिकवून ठेवला आहे. तीच समाजाची मोठी ताकद असून जैन समाज हा यशस्वी समाज म्हणून गणला जात आहे. जैन परंपरा हा पुस्तकात सांगितलेला विचार नाही तर, काळानुसार उत्क्रांत झालेला विचार आहे. अनेकांतवाद हे जैन धर्माचे तत्त्वज्ञान असून उपनिषदात सांगितलेला विचार आणि जैन विचार एकच आहे. तो विचार विज्ञाननिष्ठ असल्याने आजच्या काळातही टिकून आहे. वारसारूपाने आलेले विचार पुढील पिढीपर्यंत संक्रमित केले तर भविष्यातही जैन समाज सशक्त आणि स्वयंपूर्ण समाज म्हणून टिकून राहील. संप्रदायाची ताकद कमी होत असून नव्या ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती होत आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याकडील संस्कार कसे वापरायचे याचे आव्हान आपल्यापुढे आहे.
जैन समाज प्रयत्नवादी असल्याचे सांगून गिरीश बापट म्हणाले, प्रयत्नाने जीवनात परिवर्तन करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे. कष्ट आणि कौशल्याच्या जोरावर स्वत:चा उत्कर्ष साधण्याबरोबरच समाजाला पुढे घेऊन जाण्याची वृत्ती या समाजामध्ये अधिक असल्याचे दिसते. त्यामुळेच देशाच्या प्रगतीमध्ये जैन समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
देशाच्या विकासामध्ये कृतिशील असलेल्या जैन समाजाचे मोठे योगदान असल्याचे अनिल शिरोळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाने मोठा निधी जमा केला असून ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा मानस असल्याचे तेजराज गुलेचा यांनी सांगितले. उद्योजक आणि व्यापाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न जितो कनेक्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे विजय भंडारी यांनी सांगितले. राजेश सांकला यांनी या परिषदेचा जैन व्यापाऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.