गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचे मत; एल्गार परिषदेचे उद्घाटन

गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची दीडशे जागांची घमेंड आम्ही ९९ जागांवर आणून ठेवली. जात-धर्म बाजूला ठेवून देशाची जनता कामगार, शेतकरी आणि युवा म्हणून मतदान करेल तेव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप दोन आकडय़ांवर येईल, असे मत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी रविवारी व्यक्त केले. अंबानी आणि अदानी ही देशातील सर्वात मोठी ब्राह्मणवादी ताकद आहे, असा आरोपही त्यांनी केला.

भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानानिमित्त आयोजित एल्गार परिषदेत मेवाणी बोलत होते. रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांच्या हस्ते मडकी फोडून परिषदेचे उद्घाटन झाले. भगतसिंग, आंबेडकर स्टुडंट्स ऑर्गनायझेशनचे उमर खालीद, भीम आर्मीचे अध्यक्ष विनय रतन सिंग, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे प्रशांत दोंथा, भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, न्या. बी. जी. कोळसे-पाटील, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन आणि बस्तर येथील आदिवासी नेत्या सोनी सोरी या वेळी उपस्थित होत्या.

कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत भाजपला हटविण्याची वेळ आली आहे. कोण सत्तेवर येणार यापेक्षाही भाजप पराभूत होण्यामध्ये मला स्वारस्य असल्याचे मेवाणी यांनी सांगितले. चार वर्षे विकासाच्या गप्पा मारणारे मोदी निवडणुकीच्या वेळी ‘राम विरुद्ध हज’ ची भाषा बोलतात. ‘हज’ म्हणजे हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश. संसदेत आणि विधानसभेत नाही तर रस्त्यांवरील जनआंदोलनांतूनच क्रांती होणार आहे. १४ एप्रिल रोजी नागपूरला येऊन मी ‘संघ समाप्ती’ची घोषणा करेन, असेही मेवाणी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित पँथरमुळे महाराष्ट्राचा देशभरात लौकिक आहे. भीमा कोरेगाव येथील लढाईत दलितांनी पेशवाईचा बिमोड केला, पण स्वातंत्र्यानंतरही मनुवाद जिवंत आहे, असे उमर खालीद यांनी सांगितले. आपल्याकडे अणुबॉम्ब आहे. पण, गटार साफ करण्याचं तंत्रज्ञान नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तुम्ही राज्य घटना बदलून दाखवा. तिचे संरक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा इशारा विनय रतन सिंग यांनी दिला. राजकारणासाठी समाजामध्ये फूट पाडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक पेशवाईविरोधात लढा

रोहित आणि त्याच्या चार मित्रांना बहिष्कृत करून शिक्षा देण्याचे काम भाजप सरकारने केले, असा आरोप रोहितची आई राधिका वेमुला यांनी केला. गृहिणी असलेली मी चळवळीचा भाग झाले. मला जे भोगावे लागले ते तुमच्या वाटय़ाला येऊ नये यासाठी एकत्र येऊन आधुनिक पेशवाईविरोधात लढा, असे आवाहन त्यांनी केले.